नाशिक : शहरात सोनसाखळी चोरीचे सत्र पुन्हा एकदा सुरू झाल्याचे चित्र असून वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र भामट्यांनी ओरबाडून नेले. एका घटनेत चोरट्यांनी दुकानात येऊन व्यावसायिक महिलेचे मंगळसूत्र खेचून नेले.
दुकानात येऊन सोनसाखळी खेचून नेण्याचा प्रकार पंचवटीतील हनुमानवाडी परिसरात घडला. याबाबत आशा कराड यांनी तक्रार दिली. त्यांचे महालक्ष्मी नावाने किराणा दुकान आहे. त्या आपल्या दुकानात असताना दुचाकीवर आलेल्या दोघा संशयितांपैकी एकाने साबणाची मागणी केली.
हेही वाचा : विश्लेषण : ‘आदिपुरुष’वर खरंच बंदी घातली जाऊ शकते का? सेन्सॉर बोर्डचे नियम जाणून घ्या
हेही वाचा : चीनला ‘जशास तसे’ उत्तर का नाही ?
कराड या साबण घेऊन आल्या असता संशयिताने त्यांच्या गळ्यातील ९० हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र खेचले. क्षणार्धात दोघे चोरटे पसार झाले. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दुसरी घटना इंदिरा नगर भागात घडली. सुमन चव्हाण (७०, रथचक्र सोसायटी) या वृध्द महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार सकाळी भाजीपाला आणि फुले घेण्यासाठी त्या घराबाहेर पडल्या होत्या. परिसरातून फुले, भाजीपाला घेऊन त्या घराकडे परतत असताना ही घटना घडली. वनसंपदा सोसायटी भागातील बंगल्यासमोरून त्या पायी जात असतांना दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्यांना आवाज देऊन त्यांच्या गळ्यातील ६० हजार रुपयांची पोत हिसकावून नेली.
हेही वाचा : लष्करी अभियंत्यांना एक लाख १६ हजारांची लाच स्वीकारताना अटक
या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याआधी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने चोरट्यांनी अगदी घराच्या प्रवेशद्वारावर येऊन सोन्याची पोत खेचून नेण्याचा प्रकार घडला आहे. आता दुकानदार महिलांच्या दागिन्यांवरही त्यांचे लक्ष गेल्याचे रामवाडीतील घटनेतून समोर आले. मागील काही वर्षात सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये लाखो रुपयांचे सोने लंपास झाले आहे. काही प्रकरणात संशयित हाती लागले तर अनेक प्रकरणात ते लागलेले नाहीत. या घटनांना पायबंद घालण्यासाठी प्रभावी उपाय होत नसल्याची महिला वर्गाची तक्रार आहे.