पेशवेकालीन तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मंदिर प्रवेश सत्याग्रहाचा साक्षीदार असलेल्या श्री काळाराम मंदिरातील मूर्तीना बुधवारी मिरवणूक काढत सुवर्णालंकारांचा साज चढविण्यात आला. भाविकांनी मंदिरात दान केलेल्या रकमेतून तसेच दागिन्यांना एकत्र करत राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्तीसाठी हे दागिने घडविण्यात आले आहेत. दागिन्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांचा विमा उतरविण्यात आला असून उत्सव काळात त्यांचा वापर होईल.
पेशवे काळात या मंदिराची निर्मिती झाली. राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या निवासाची साक्ष म्हणून पेशव्यांनी दगडी बांधकामात मंदिराची उभारणी केली. मंदिरातील मूर्तीही पाषाणाच्या आहेत. वर्षभर या ठिकाणी लाखो भाविकांचा राबता असतो. संस्थानकडे देणगी स्वरूपात जमा होणारे सोन्याचे दागिने पाहता त्यांचे करायचे काय, या प्रश्नाचे उत्तर शोधताना मूर्तीला पारंपरिक साजातील सुवर्णालंकार तयार करण्याचा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी कार्यकारिणीने केला होता. संस्थानकडे सुमारे दीडशे वर्षांपूर्वीचे पारंपरिक रत्नजडित दागिने आहेत. या दागिन्यात भर घालावी, अशी मागणी विश्वस्तांनी केली होती. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे हा प्रस्ताव प्रलंबित राहिला. मागील महिन्यात झालेल्या विश्वस्त बैठकीत पुन्हा एकदा सुवर्णालंकार तयार करण्याचा प्रस्ताव पुढे आला. देवस्थानच्या विश्वस्त मंडळाने हा प्रस्ताव मान्य करून त्याची अंमलबजावणी केली. देवस्थानकडे २१ तोळे सोने होते. १० तोळे सोने खरेदी करण्यात आले. दंडे ज्वेलर्स आणि गुरव सराफ यांच्या सहकार्याने राम, लक्ष्मण यांच्यासाठी १० तोळ्याचे, तर सीतेच्या मूर्तीसाठी ११ तोळ्यांचा सोन्याचा हार तयार करण्यात आला. यासाठी बाहेरील कारागिरांची मदत घेण्यात आली. बुधवारी पहाटे मूर्तीच्या विधिवत पूजनानंतर विश्वस्तांच्या हस्ते मंदिर आवारात दागिन्यांची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीनंतर विश्वस्तांच्या हस्ते हे अलंकार मूर्तीना अर्पण करण्यात आले.
दरम्यान, शहर परिसरातील मंदिरातील वाढते चोरीचे प्रकार लक्षात घेऊन दागिन्यांचा विमा उतरविण्यात आला आहे. उत्सव काळात हे दागिने मूर्तीना परिधान करण्यात येणार असल्याचे विश्वस्त वैभव पुजारी यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा