जळगाव : शहरातील सराफ बाजारात गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी सुमारे १०३० रुपयांची घट नोंदविण्यात आल्याने सोने दर ९३ हजार ५२४ रुपये प्रतितोळापर्यंत खाली आले. दरवाढीनंतर उच्चांकी पातळीवर पोहोचलेल्या सोने दरात मागील काही दिवसात पहिल्यांदा मोठी घसरण झाल्याने व्यापाऱ्यांसह ग्राहकांना दिलासा मिळाला.
१९ मार्चला पहिल्यांदा सोने दर उच्चांकी ९१ हजार ८७६ रुपयांपर्यंत गेले होते. त्यानंतर २८ मार्चला सोने दराने मागचा उच्चांक मोडीत काढून पुन्हा ९२ हजार ३९१ रुपयांची नवी झेप घेतली होती. तेव्हापासून सोने दरात सातत्याने वाढ झाली. गुढीपाडव्यानंतर मंगळवारी देखील सोन्याचे दर पुन्हा उच्चांकी ९४ हजार ३४८ रुपयांपर्यंत पोहोचले होते. सोने दरात दिवसागणिक उच्चांकी वाढ होत असल्याचे पाहून, त्यात आगामी काळात फार घट होण्याची आशा व्यापाऱ्यांसह ग्राहकांनी सोडून दिली होती. उच्चांकी दरवाढीचा वेग असाच कायम राहिल्यास सोने लवकरच एक लाखांचा टप्पा ओलांडेल. आवाक्याबाहेर गेलेल्या सोने दरामुळे अनेक वर्षांची परंपरा असलेल्या सराफ बाजाराला अवकळा आल्याशिवाय राहणार नाही, अशी भीती सुवर्ण व्यवसायातील जाणकारांनी व्यक्त केली होती. प्रत्यक्षात शुक्रवारी तब्बल १०३० रुपयांची घसरण झाल्याने सोने ९४ हजाराच्या खाली आले. लग्नसराईत गुंतलेल्यांना सोन्याचे दर कमी झाल्याने हायसे वाटले. परंतु, सोने दर पुन्हा वाढण्याची भीतीही त्यांना आहे.
चांदीही एक लाखाच्या आत
जळगावात गुरुवारी चांदी एक लाख एक हजार ९७० रुपये प्रति किलो होती. त्यात दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सुमारे ४१२० रुपयांची घट नोंदविण्यात आल्याने चांदीचे दर ९७ हजार ८५० रुपयांपर्यंत घसरले. यापूर्वी १९ मार्चला चांदीनेही उच्चांकी एक लाख पाच हजार ६० रुपयांचा दर गाठला होता.