लोकसत्ता प्रतिनिधी

जळगाव : शहरातील सराफ बाजारात शनिवारी २४ कॅरेट सोन्याच्या दरात ३०९ रुपयांची वाढ नोंदविण्यात आल्याने जीएसटीसह प्रतितोळा ९९ हजार ४९८ रुपयांपर्यंत दर पोहोचले होते. सोमवारी बाजार उघडताच ६१८ रुपयांची घट नोंदविण्यात आल्याने सोन्याचे दर प्रतितोळा ९८ हजार ८८० रुपयांपर्यंत घसरले. ग्राहकांना त्यामुळे पुन्हा दिलासा मिळाला.

अक्षय्य तृतियेच्या सणापूर्वी सोन्याचे दर उच्चांकी पातळीवर असताना, पुढील काही दिवसात त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. प्रत्यक्षात, सोने दरात गेल्या आठवड्यात शुक्रवारपर्यंत २६७८ रुपयांनी घट झाल्याने ग्राहकांना थोडाफार दिलासा मिळाला होता. मात्र, शनिवारी बाजार उघडताच पुन्हा ३०९ रुपयांची वाढ नोंदविण्यात आल्याने सोन्याचे दर प्रतितोळा ९९ हजार ४९८ रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले. अशा प्रकारे दरात चढ-उतार सुरू असतानाच, सोमवारी सोने परत ६१८ रुपयांनी स्वस्त झाले.

गुढी पाडव्यानंतर सोन्याच्या किमती सर्वकालिन उच्चांकावर पोहोचल्या होत्या. मात्र, आता सराफ बाजारात सकारात्मक बदल घडताना दिसत आहेत. तज्ज्ञांच्या मते, अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार तणाव कमी झाल्याने आणि जागतिक पातळीवरील आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाल्याने सोन्याची मागणी थोडी खालावली आहे. त्याचबरोबर भारतीय शेअर बाजारातही तेजीचा कल पाहायला मिळतो आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांनी त्यांचा मोर्चा इतर गुंतवणूक पर्यायांकडे वळविण्यास सुरुवात केली आहे. अर्थातच, अलीकडच्या या घडामोडींमुळे सोन्याच्या किमतीवर दबाव निर्माण झाला आहे. सोन्याची किंमत ९९ हजार रुपयांच्या खाली आली असून, हा बदल अनेक गुंतवणूकदारांसाठी अनपेक्षित ठरला आहे.

चांदीच्या दरातही १४४२ रुपये घट

जळगावमध्ये शुक्रवारी २०६ रुपयांची किरकोळ घट नोंदविण्यात आल्याने चांदी एक लाख एक हजार ४५५ रुपयांपर्यंत घसरली होती. शनिवारी देखील तेच दर कायम राहिले. त्यानंतर सोमवारी पुन्हा १४४२ पयांची घट नोंदविण्यात आल्याने चांदी एक लाख १३ रूपयांपर्यंत घसरली.