जळगाव – शहरातील सराफ बाजारात गुरूवारी २४ कॅरेट सोन्याचे दर प्रतितोळा ९७ हजार ८५० रुपयांपर्यंत होते. शुक्रवारी ८२४ रुपयांची वाढ नोंदविण्यात आल्याने सोन्याचे दर जीएसटीसह प्रतितोळा ९८ हजार ६७४ रुपयांपर्यंत गेले. हा सोने दराचा नवीन उच्चांक आहे.
जळगावमध्ये ११ एप्रिलला उच्चांकी ९५ हजार ९९६ रुपयांपर्यंत पोहोचलेल्या सोने दरात तेव्हापासून कमी-अधिक फरकाने सातत्याने दरवाढ सुरूच असून, शुक्रवारपर्यंत त्यात सुमारे २६७८ रुपयांची वाढ नोंदविण्यात आली. दरवाढीचा चढता आलेख लक्षात घेता सोने एक लाखापर्यंत पोहोचण्यास अधिक दिवस लागणार नाहीत, असे सुवर्ण व्यावसायिकांचे मत आहे. सोने दरातील उच्चांकी दरवाढ लक्षात घेता अशी दरवाढ आणखी किती दिवस चालू राहील, असा प्रश्न ग्राहकांनाही पडला आहे.
अक्षय्य तृतियेपर्यंत सोने दर कोणता टप्पा गाठेल, त्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मे महिन्यात लग्नकार्य असलेल्यांकडून किंमत आणखी वाढण्यापूर्वी सोने खरेदी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, उच्चांकी दरवाढीमुळे त्यांना आर्थिक ऐपतीनुसार सोने खरेदी करताना थोडा हात आखडताच घ्यावा लागत आहे. सराफ बाजारातील तज्ज्ञांच्या मते, पुढील दोन आठवड्यात सोन्याच्या किंमतीत आणखी वाढ होऊ शकते.
चांदीचे दर स्थिर
जळगावमध्ये गुरूवारी चांदीचे दर प्रतिकिलो ९९ हजार ९१० रुपये होते. शुक्रवारी कोणतीच वाढ अथवा घट नोंदविण्यात न आल्याने चांदीचे दर स्थिर राहिले. चांदीच्या दरात पुढील दोन-तीन दिवस फार बदल होण्याची शक्यता नसल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.