जळगाव – शहरातील सराफ बाजारात १९ मार्चला उच्चांकी ९१ हजार ८७६ रुपयांपर्यंत पोहोचलेल्या सोने दराने शुक्रवारी मागचा उच्चांक मोडीत काढून सुमारे ९२ हजार ३९१ रुपयांची नवी झेप घेतली. सोने दरातील आजपर्यंतची सर्वोच्च दरवाढ लक्षात घेता सराफ बाजारात त्यामुळे खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वी उच्चांकी ९१ हजार ८७६ रुपयांपर्यंत पोहोचलेले सोन्याचे दर नंतरच्या काळात काहीअंशी कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला होता. आता सोन्याचे दर फार वाढणार नाहीत. आणि आपल्याला गुढीपाडव्याला थोडेफार सोने खरेदी करता येईल, अशी आशा ग्राहकांना होती. मात्र, दोनच दिवसात सराफ बाजारातील चित्र बदलले. सोन्याचे दर पुन्हा तेजीकडे झेपावले. गुरूवारी जळगावच्या सराफ बाजारात ९१ हजार १५५ रुपये प्रति तोळा असलेले सोने दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी १२३६ रुपयांनी वाढून उच्चांकी ९२ हजार ३९१ रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले.

सोने दर नव्या उंचीवर पोहोचल्यानंतर चांदीच्या दरानेही उसळी घेतल्याचे दिसून आले आहे. गुरूवारी जळगावमध्ये चांदी एक लाख तीन हजार ७२१ रुपये प्रति किलो होती. त्यात दुसऱ्या दिवशी शुक्रवारी १३३९ रुपयांची वाढ नोंदवण्यात आल्याने चांदी एक लाख पाच हजार ६० रुपयांपर्यंत पोहोचली. यापूर्वी १९ मार्चला चांदीने उच्चांकी दर गाठला होता. शुक्रवारी त्या दराची चांदीने पुन्हा बरोबरी केली.

दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी सोन्याचे दर काहीसे कमी झाले होते. त्यामुळे गुढी पाडव्याला सराफ बाजारात चैतन्य निर्माण होण्याची आशा सुवर्ण व्यावसायिकांना होती. मात्र, गुढी पाडवा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना सोने ,चांदीच्या दरात झालेल्या मोठ्या वाढीमुळे ग्राहकांमध्ये निराशा पसरली आहे. दरवाढीमुळे बरेच ग्राहक सराफ बाजारात फिरकण्याची शक्यताही कमी झाली आहे. काही ग्राहक त्यांच्या आर्थिक कुवतीनुसार बसणाऱ्या कमी वजनाच्या दागिन्यांची खरेदी करण्याचा विचार करू लागले आहेत. सुवर्ण व्यावसायिकांमध्ये त्यामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे.

सोन्याचे दर आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींवर अवलंबून असतात. सध्या डॉलरचा दर, आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याच्या किमतीतील चढ-उतार आणि स्थानिक बाजारातील मागणी याचा एकत्रित परिणाम सोन्याच्या किमतीवर दिसून येत आहे. सोन्याच्या किंमतीने नवा उच्चांक गाठल्यामुळे खरेदीदारांमध्ये आधीच चिंतेचे वातावरण आहे. ग्राहक कमी झाल्याने सुवर्ण व्यवसायाला मंदीला तोंड द्यावे लागत आहे.