जळगाव: शहरातील सराफ बाजारात गुरूवारी २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रतितोळा ९९ हजार ३९५ रुपयांपर्यंत होते. शुक्रवारी २०६ रुपयांची घट नोंदविण्यात आल्याने दर ९९ हजार १८९ रुपयांपर्यंत खाली आले होते. तीन दिवसात सोन्याचे दर २६७८ रुपयांनी कमी झाल्याने ग्राहकांना थोडाफार दिलासा मिळाला असताना शनिवारी बाजार उघडताच पुन्हा ३०९ रुपयांची वाढ नोंदविण्यात आल्याने २४ कॅरेट सोन्याचे दर प्रतितोळा ९९ हजार ४९८ रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले. सोने दरात सुरू असलेले मोठे चढ-उतार लक्षात घेता ग्राहकही आता संभ्रमात पडले आहेत. जळगावमध्ये दोन आठवड्यात दरवाढीत सातत्य राहिल्याने सोन्याचे दर १० हजार ५०६
रुपयांनी वधारून प्रतितोळा एक लाख एक हजार ९७० रुपयांपर्यंत पोहोचले होते. अक्षय्य तृतियेच्या सणापूर्वीच सोन्याचे दर गगनाला भिडलेले असताना, पुढील काही दिवसात त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता सुवर्ण व्यवसायातील जाणकारांनी व्यक्त केली होती. प्रत्यक्षात, सोने दरात बुधवारी २४७२ रुपयांनी तसेच गुरूवारी १०३ आणि शुक्रवारी २०६ रुपयांनी घट नोंदविण्यात आली. मात्र, जेवढ्या वेगाने सोन्याचे दर वधारले होते, त्या वेगाने ते खाली येत नसल्याचे दिसून आले आहे. तरीही अक्षय्य तृतियेच्या सणाला सोने विक्रीला बऱ्यापैकी चालना मिळण्याची आशा सुवर्ण व्यावसायिक बाळगून असताना प्रत्यक्षात, शनिवारी बाजार उघडताच तीन दिवसांच्या खंडानंतर सोने दराने पुन्हा उसळी घेतल्याचे दिसून आले. सध्याचे चढ-उतार लक्षात घेता अक्षय्य तृतियेपर्यंत सोन्याचे दर आणखी वधारतात की घसरतात, त्याचा अंदाज लावणे सुवर्ण व्यवसायातील जाणकारांसाठी त्यामुळे कठीण झाले आहे.
उच्चांकी दरवाढीनंतर सराफ बाजारातील सोने विक्री थंडावल्याने बहुतेकांना नुसते हातावर हात धरून बसावे लागले आहे. दुसरीकडे, सोने दरातील मोठे चढ-उतार लक्षात घेता गुंतवणूकदारांनाही आता संभ्रमात टाकले आहे. अनेक जण बाजार जोखमीचा अंदाज घेऊन आताच्या घडीला सोन्याची खरेदी करावी किंवा नाही, असा विचार करू लागल्याचे सुवर्ण व्यवसायातील जाणकारांनी सांगितले.
चांदीच्या दरात किरकोळ घट
जळगावमध्ये गुरूवारी ७२१ रुपयांची वाढ नोंदविण्यात आल्याने चांदी प्रतिकिलो एक लाख एक हजार ६६१ रुपयांपर्यंत पोहोचली होती. मात्र, शुक्रवारी २०६ रुपयांची किरकोळ घट नोंदविण्यात आल्याने चांदी एक लाख एक हजार ४५५ रुपयांपर्यंत खाली आली होती. हेच भाव शनिवारी बाजार उघडल्यावरही कायम राहिले