लोकसत्ता प्रतिनिधी

जळगाव : शहरातील सराफ बाजारात शुक्रवारी उच्चांकी ९२ हजार ३९१ रुपये प्रतितोळापर्यंत पोहोचलेल्या सोने दराची घोडदौड दुसऱ्या दिवशीही कायम राहिली. शुक्रवारच्या तुलनेत २०६ रुपयांची वाढ नोंदविण्यात आल्याने शनिवारी सोने प्रतितोळा ९२ हजार ५९७ रुपये झाले. आदल्या दिवसाचा उच्चांक मोडीत काढून नवा उच्चांक केला.

जळगावमध्ये मागील आठवडाभरापासून चढ-उतार सुरू असलेल्या सोने दराने शुक्रवारी अचानक मोठी झेप घेऊन सर्वोच्च दर गाठले होते. शनिवारी त्यात पुन्हा वाढ नोंदवण्यात आल्यामुळे सोने आणखी नव्या उंचीवर जाऊन पोहोचले. सध्याच्या वेगवान घडामोडी लक्षात घेता हळूहळू सोने एक लाखांचा आकडा गाठते की काय, अशी भीती ग्राहकांसह सुवर्ण व्यावसायिकांमधून व्यक्त होत आहे. सोने दराची उच्चांकी घोडदौड सुरू असताना शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी चांदीत किलोमागे १०३० रुपयांची घट नोंदवण्यात आली. परिणामी, चांदी एक लाख चार हजार रुपयांपर्यंत खाली आली.

गुढी पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहुर्त मानला जातो. या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते, त्यामुळे ग्राहक मोठ्या उत्साहाने दागिन्यांची खरेदी करतात. मात्र, यंदा सोने व चांदीच्या दरातील वाढीमुळे ग्राहकांमध्ये नाराजी पसरली आहे. वाढत्या किंमतींमुळे अनेकांनी खरेदीला माफक स्वरूप दिले आहे, तर काहींनी खरेदी पुढे ढकलण्याचा विचार केला आहे. दुसरीकडे, ही वाढ व्यावसायिकांसाठीही चिंतेची बाब ठरली असून, मागणी अपेक्षेपेक्षा कमी राहिल्याने त्यांच्या व्यवहारांवर त्याचा विपरीत परिणाम झाल्याचे बोलले जात आहे.

दर आवाक्यात असेपर्यंत सराफ बाजारात श्रीमंतांसोबत कमी उत्पन्न गटातील ग्राहक देखील सोने खरेदीचे स्वप्न साकारताना दिसायचे. मात्र, अलिकडे सोने दराने गाठलेला उच्चांक लक्षात घेता सराफ बाजारात सामान्य ग्राहक दिसेनासा झाला आहे. जेवढे काही ग्राहक गुंतवणुकीच्या उद्देशाने सोने खरेदी करत आहेत, त्यांचीही मानसिकता दागिन्यांऐवजी सोन्याचे बिस्कीट खरेदी करण्याकडे जास्तकरून आहे. या कारणाने सोन्याच्या दागिन्यांचा खप गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. सुवर्ण अलंकार घडवण्यासाठी यापूर्वी १२ ते १४ तास राबणाऱ्या बंगाली कारागिरांच्या हाताला दिवसभरात दोन-तीन तासांचेही काम हल्ली नसते.

दागिन्यांच्या घडावळीचे काम थांबल्याने जळगावच्या गोलाणी संकुलात हातावर हात धरून बसलेल्या बंगाली कारागिरांच्या चेहऱ्यावरचे चिंतेचे भाव स्पष्टपणे दिसून येत होते. नोटबंदीनंतर करोनाच्या काळात सुवर्ण बाजारपेठ ठप्प झाल्याने आमच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली होती. त्यातून सावरत नाही तितक्यात सोने दरवाढीच्या संकटाने सुवर्ण अलंकार घडवण्याचे काम आणखी थंडावले आहे. अलंकार घडवून मिळणाऱ्या मजुरीवर सध्या फक्त पोटच भरत आहे. थोडेफार बचत करून पैसे घरी पाठवणे दिवसेंदिवस मुश्किल होत आहे, असे भोलानाथ रॉय या कारागिराने सांगितले.