जळगाव : शहरातील सराफ बाजारात शनिवारी २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रतितोळा ९८ हजार ७७७ रूपयांपर्यंत पोहोचले हो ते. सोमवारी दिवसभरात १६४८ रूपयांची वाढ नोंदविण्यात आल्याने सोन्याचे दर प्रतितोळा एक लाख ४२५ रूपयांपर्यंत गेले. हा सोने दराचा नवीन उच्चांक आहे.

दरम्यान, सोन्याच्या किमती दररोज नवीन उच्चांक गाठत असताना सुवर्ण व्यवसायातील तज्ज्ञही आता संभ्रमात पडले आहे. बाजारातील अस्थिरतेमुळे आणि जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोने दरवाढीबाबतचा कोणताही ठोस अंदाज वर्तविणे त्यांच्यासाठी आव्हानात्मक बनले आहे. चांगल्या परताव्यासाठी सोने खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठीही योग्य निर्णय घेणे कठीण झाले आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता थांबा आणि वाट पाहा, अशी भूमिका बऱ्याच गुंतवणुकदारांनी घेतल्याचे चित्र आहे.

दुसरीकडे, अक्षय तृतियेचा सण जवळ आलेला असताना शुभ मुहुर्तावर सोने खरेदी करता यावी म्हणून ग्राहक दर कमी होण्याची वाट होते. मात्र, अक्षय तृतीया जसजशी जवळ येत आहे तसे सोन्याचे दर आवाक्याबाहेर जाऊ लागले आहेत.सोने उत्तरोत्तर वाढत असताना, त्यात येत्या काही दिवसात मोठी घट होण्याची आशा सुवर्ण व्यावसायिकांनी सोडून दिली आहे. अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धावर काही सकारात्मक चर्चा झाली तरच पुढे सोन्याच्या किमतीतील वाढ थांबू शकते. सोने दराने एक लाखांचा टप्पा ओलांडल्याने त्याचा मोठा दूरगामी परिणाम सुवर्ण व्यवसायावर पुढील काळात होण्याची भीती आता व्यक्त होत आहे.

चांदीच्या दरात पुन्हा घसरण

सोने दरात सातत्याने वाढ होत असताना, जळगावमध्ये चांदीचे दर गेल्या तीन दिवसांपासून प्रतिकिलो ९९ हजार ९१० रूपयांपर्यंत स्थिर होते. मात्र, सोमवारी ५१५ रूपयांची घट झाल्याने चांदीचे दर प्रतिकिलो ९९ हजार ३९५ रूपयांपर्यंत घसरले.