लोकसत्ता प्रतिनिधी

जळगाव : शहरातील सराफ बाजारात जीएसटीसह प्रतितोळा ९५ हजार ९९६ रुपयांपर्यंत पोहोचलेल्या सोने दराने शुक्रवारी नवीन उच्चांक केला होता. शनिवारी त्यात ६१८ रुपयांची वाढ नोंदविण्यात आल्याने प्रतितोळा ९६ हजार ६१४ रुपयांपर्यंत सोने गेले आहे. हा नवीन उच्चांक आहे.

चार दिवसात झालेली दरवाढ लक्षात घेता सोने लवकरच एक लाखाचा आकडा गाठण्याची शक्यता सुवर्ण व्यवसायातील जाणकारांनी व्यक्त केली आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार तणावामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून गुंतवणूकदारांनी सोन्याची खरेदी वाढवली आहे. त्यामुळेही आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव सर्वकालीन उच्चांकावर पोहोचल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

चांदीत एकाच दिवसात २३६९ रुपये वाढ

जळगावमध्ये शुक्रवारी चांदीचे दर जीएसटीसह प्रतिकिलो ९६ हजार ३०५ रुपये होते. शनिवारी त्यात २३६९ रुपयांची वाढ नोंदविण्यात आल्याने चांदी जीएसटीसह प्रतिकिलो ९८ हजार ६७४ रुपयांपर्यंत गेली. उच्चांकी एक लाख पाच हजार रुपयांपर्यंत पोहोचलेल्या चांदीच्या दरात मध्यंतरी मोठी घसरण झाली होती. मात्र, चांदीच्या दराने आता उसळी घेतली आहे.