जळगाव : शहरातील सराफ बाजारात गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी ८२४ रुपयांची वाढ नोंदविण्यात आल्याने सोने दराने जीएसटीसह प्रति तोळा ९३ हजार ४२१ रुपयांचा नवीन उच्चांक केला. गेल्या वर्षी ३१ मार्चला प्रति तोळा ७० हजार ६८५ रुपये असलेले सोने वर्षभरात तब्बल २२ हजार ७३६ रुपयांनी वधारले आहे.जळगावमधील सराफ बाजारात शनिवारी ९२ हजार ५९७ रुपयांपर्यंत मजल मारत सोने दराने एक नवा उच्चांक केला होता. गुढी पाडव्याच्या दिवशी शनिवारचेच दर कायम राहिले. साडेतीन मुहुर्तापैकी एक मानल्या जाणाऱ्या गुढी पाडव्याच्या सणाला दागिन्यांची खरेदी शुभ मानली जाते. परिणामी, गुढी पाडव्याला नेहमीच्या विक्रीपेक्षा तीन ते चारपट जास्त दागिन्यांची विक्री सराफ बाजारात दरवर्षी होत असते. त्यामुळे ग्राहक गुढी पाडव्याला सोने खरेदीसाठी सराफ बाजाराकडे वळतील, अशी आशा सुवर्ण व्यावसायिकांना होती.

मात्र, उच्चांकी दरवाढीच्या पार्श्वभूमीवर अपेक्षित सोने विक्री गुढी पाडव्याच्या दिवशी होऊ शकली नाही. एरवी दरवर्षीच्या गुढी पाडव्याला जेवढी सोन्याच्या दागिन्यांची विक्री होते, त्यापेक्षा १५ ते २० टक्क्यांनी कमी विक्री यंदा झाली. उच्चांकी दरवाढीनंतर आपल्या आर्थिक कुवतीनुसार कमी वजनाचे दागिने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा ओढा राहिल्याने सोने विक्रीतून होणाऱ्या आर्थिक उलाढालीवर फार परिणाम झाला नाही. परंतु, ग्रॅममध्ये बोलायचे झाल्यास गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या गुढी पाडव्याला सोने विक्री मोठ्या प्रमाणात प्रभावित झाल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले.

साडेतीन मुहुर्ताच्या सोने खरेदीला उच्चांकी दराचा मोठा फटका बसला. त्यातून सावरत नाही, तितक्यात सोमवारी पुन्हा सोने दरात शनिवार आणि रविवारच्या तुलनेत तब्बल ८२४ रुपयांनी वाढ झाली. परिणामी, सोने दराने ९३ हजारांवर उसळी घेतली. सराफ बाजारातील हे आजपर्यंतचे सर्वोच्च दर आहेत.सोन्याच्या तुलनेत चांदीने प्रतिकिलो एक लाख पाच हजार रुपये असा उच्चांक प्रस्थापित केल्यानंतर कमी-अधिक फरकाने सध्या दर बऱ्यापैकी नियंत्रणात आहेत. सोमवारी चांदी तीन टक्के जीएसटीसह एक लाख चार हजार ५४५ रुपये प्रतिकिलो होती.

सुवर्ण व्यवसायातील तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सतत वाढणारी मागणी, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन आणि गुंतवणुकीचा वाढता कल, या काही कारणांमुळे सोन्याच्या किंमतींवर परिणाम होत आहे. पुढील काही दिवसांत २४ कॅरेट सोन्याचा प्रति १० ग्रॅमचा दर एक लाख रुपयांच्या आसपास जाऊ शकतो. जागतिक अर्थव्यवस्था, मध्यवर्ती बँकांची धोरणे आणि भूराजकीय तणाव यामुळे सोन्याच्या किंमती उच्चांकी स्तरावर पोहोचण्याची शक्यता आहे.