लोकसत्ता प्रतिनिधी
जळगाव : शहरातील सराफ बाजारात सोने दराने शुक्रवारी प्रतितोळा सुमारे ९५ हजार ९९६ रुपयांपर्यंत मजल मारत पुन्हा नवा उच्चांक केला. सोन्याचे दर मध्यंतरी काही प्रमाणात घसरल्याने सुटकेचा निःश्वास सोडणाऱ्या ग्राहकांसह सुवर्ण व्यावसायिकांमध्ये त्यामुळे निराशा निर्माण झाली आहे.
जळगावमध्ये गुरूवारी जीएसटीसह सोन्याचे दर प्रतितोळा ९४ हजार ३९ रुपये होते. त्यात दुसऱ्या दिवशी शुक्रवारी तब्बल १९५७ रुपयांची वाढ नोंदविण्यात आल्यानंतर सोने दर ९५ हजारांवर गेले. गुढीपाडव्यानंतर उच्चांकी ९४ हजार ३४८ रुपयांपर्यंत पोहोचलेल्या सोने दरात आठ एप्रिलपर्यंत तब्बल २८८४ रुपयांनी घसरण झाल्याने सराफ बाजारात चैतन्य निर्माण झाले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा सातत्याने वाढ होत राहिल्याने सोन्याचे दर शुक्रवारपर्यंत ४५३२ रुपयांनी वधारले.
अमेरिकेने टॅरीफ कर लादल्यानंतर अनेक तज्ज्ञांनी सोने आणि चांदीच्या किमतीत घट होण्याची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार काही दिवस दर घसरल्याने सोने व चांदी आता खूपच स्वस्त होईल, अशी चर्चा सराफ बाजारात सुरू झाली होती. तथापि, दोन्ही धातुंच्या किमती कमी होण्याऐवजी पुन्हा गगनाला भिडताना दिसून आल्या आहेत. सोने त्याच्या सर्वकालीन उच्चांकावर असताना, चांदी देखील सतत वर जात आहे.
दरम्यान, सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना किमती घसरल्याने तोटा सहन करावा लागला होता. मात्र, सराफ बाजारातील तेजीमुळे त्यांना आता दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे, दरवाढीमुळे सोने खरेदी ठप्प झाल्याने मंदीची झळ सोसणाऱ्या सुवर्ण व्यावसायिकांच्या अडचणी आणखी वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.