लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जळगाव : जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन, उपसा आणि वाहतूक सर्रास सुरू असल्याचे भडगाव तालुक्यातील कारवाईतून पुन्हा सिद्ध झाले आहे. सहायक पोलीस अधीक्षकांच्या पथकाने केलेल्या कारवाईत पाच डंपर, पाच ट्रॅक्टर, पाच ट्रॉली, दोन जेसीबी, असा सुमारे दीड कोटींचा मुद्देमाल जप्त करून १० जणांसह इतर जप्त वाहनमालकांविरुद्ध भडगाव येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १० पैकी सात जणांना ताब्यात घेतले असून प्रमुख वाळूमाफियासह दोन जण फरार आहेत.

चाळीसगाव येथील सहायक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांना गिरणा नदीपात्रात काही जण अवैध वाळू उपसा करून तिची वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली. त्याअनुषंगाने सहायक निरीक्षक तुषार देवरे, राजेंद्र निकम, हवालदार भगवान पाटील, विकास पाटील, विश्‍वास देवरे, महेश बागूल, चेतन राजपूत, सुनील मोरे, श्रीराम कांगणे, समाधान पाटील, सुदर्शन घुले, राहुल महाजन आदींसह तपासी अंमलदार, अंमलदारांचे पथक खासगी वाहनातूत जात थेट गिरणा नदीपात्रात उतरले. तेथे जेसीबीच्या सहाय्याने ट्रॅक्टरमध्ये वाळू भरताना, तर अन्य एक जेसीबी नदीकाठावर साठा करून ठेवलेली वाळू डंपरमध्ये भरताना दिसून आले.

आणखी वाचा-नाशिक लोकसभेची जागा शिवसेनेचीच, भाजपचा दावा दादा भुसे यांना अमान्य

घटनास्थळी वाळूने भरलेले पाच डंपर, पाच ट्रॅक्टर व पाच ट्रॉली, दोन जेसीबी, असा सुमारे एक कोटी ५४ लाखांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला. संशयित संदीप पाटील (रा. वडगाव, ता. भडगाव), अक्षय महाले (रा. खालची पेठ, भडगाव), प्रवीण मोरे (रा. वरची पेठ, भडगाव), मच्छिंद्र ठाकरे (रा. वरची पेठ, भडगाव), ललित जाधव (रा. यशवंतनगर, भडगाव), शुभम भिल (रा. यशवंतनगर, भडगाव), रणजित पाटील (रा. महिंदळे, ता. भडगाव), रवी पंचर, गणेश मराठे (दोन्ही रा. पेठ, भडगाव), भोला गंजे (रा. भडगाव) व इतर जप्त वाहनांच्या मालकांविरुद्ध चाळीसगाव ग्रामीणचे पोलीस शिपाई राहुल महाजन यांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दाखल गुन्ह्यातील १० पैकी सात संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तालुक्यात वाळूमाफियांविरुद्ध आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goods worth one and a half crore seized from sand mafia in jalgaon district mrj
Show comments