नाशिक – अनेक वर्षांपासून दुरावस्थेत असणाऱ्या आणि राज्यपालांच्या दौऱ्यावेळी केवळ डागडुजी झालेल्या गोवर्धन ते यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ रस्त्याच्या काँक्रिटीकरणास अखेर मुहूर्त लाभला आहे. या रस्त्याचे भूमिपूजन देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार तथा मुक्त विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाच्या सदस्या सरोज आहिरे आणि मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.
या रस्त्याचे काम मुक्त विद्यापीठाने स्वनिधीतून करावे, असे प्रयत्न एक – दीड वर्षांपूर्वी झाले होते. तथापि, विद्यापीठाची मालकी नसलेल्या रस्त्यावर कोट्यवधींचा खर्च करणे अयोग्य असल्याने तो प्रस्ताव नाकारला गेला. शासनाने या कामासाठी सहा कोटींचा निधी उपलब्ध केल्यामुळे मुक्त विद्यापीठाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम अनेक वर्षांनंतर मार्गी लागले आहे. मुक्त विद्यापीठाच्या स्थापनेला तीन दशकांहून अधिकचा काळ लोटला आहे. शहरालगतच्या निसर्गरम्य १५० एकर जागेत हे विद्यापीठ आहे. गोवर्धन शिवारातून विद्यापीठाकडे जाणारा अडीच किलोमीटरचा ग्रामीण मार्ग आधी जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत होता. त्याची जबाबदारी शासनाने आता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिली आहे. अलीकडेच राज्यपाल रमेश बैस यांनी मुक्त विद्यापीठात भेट दिली होती. तेव्हा अनेक वर्षांनंतर कधी नव्हे ते या रस्त्याची डागडुजी करण्यात आली होती. बैस यांच्या वाहन ताफ्यास तात्पुरत्या स्वरुपात दुरुस्त केलेल्या या रस्त्याने मार्गक्रमण करावे लागले होते.
अडीच किलोमीटरच्या या मार्ग दुरुस्तीकडे संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष होत असताना व्यवस्थापन मंडळाच्या सदस्या तथा राष्ट्रवादीच्या आमदार अहिरे यांनी एक, दीड वर्षापूर्वी विद्यापीठाच्या निधीतून काँक्रिटीकरणाचा तोडगा सुचविला होता. मात्र, विद्यापीठाने त्याला विरोध केला होता. भांडवली खर्चाद्वारे विद्यापीठाची मालमत्ता निर्माण होते. रस्त्याची जागा विद्यापीठाच्या मालकीची नाही. ती शासकीय आहे. त्यामुळे रस्त्याची बांधणी करणे अयोग्य ठरेल, असे मत तेव्हा मांडण्यात आले होते. विद्यापीठाकडे जाणाऱ्या रस्त्याची परवड होत असल्याकडे प्रकाशझोत पडल्यानंतर सरकारने या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाला मान्यता दिली होती. त्या अनुषंगाने या कामास सुरुवात झाली आहे.
भूमिपूजन प्रसंगी स्थानिक आमदारांनी काँक्रिटीकरणाच्या कामाचे श्रेय घेणारे फलक लावले होते. याप्रसंगी गोवर्धनचे सरपंच गोविंद डंबाळे, उपसरपंच बाळासाहेब लांबे, विद्यापीठाचे कुलसचिव भटुप्रसाद पाटील, वित्त अधिकारी गोविंद कतलाकुटे, संचालक डॉ. प्रकाश देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता किरण पवार आदी उपस्थित होते.