एकच मिशन जुनी पेन्शन’चा नारा देत मंगळवारी सरकारी कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संपात सहभाग घेतल्याने आरोग्य सेवेसह अन्य शासकीय निमशासकीय कामे ठप्प झाली.उपलब्ध मनुष्यबळाच्या आधारावर आरोग्यसेवा सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न झाले असले,तरी प्रत्यक्षात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना ताटकळत थांबावे लागले.
हेही वाचा >>>नाशिक: शेतकरी, कष्टकऱ्यांचा दिंडोरी-मुंबई मोर्चा – २३ मार्चला विधानभवनावर धडकणार
प्रलंबित मागण्यांची शासनाला जाणीव करून देण्यासाठी ठिकठिकाणी विविध कर्मचारी संघटनांनी काम बंद ठेवले.कल्याण भवनमध्ये सारे कर्मचारी जमल्यावर तेथे संपकऱ्यां समोर संघटनांच्या पदाधिकारी,नेत्यांनी आपली भूमिका मांडली.यानंतर शिवतीर्थ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा,जेल रोड,काँग्रेस भवन,जे.बी.रोड,आग्रा रोड,कराचीवाला खुंट,जुनी महापालिका इमारत,महापालिकेची नवी इमारत व तेथून क्यूमाईन क्लब असा मोर्चा काढण्यात आला. जिल्हाभरातील शासकीय कार्यालयांमधील कारभार ठप्प झाला असून यावर तोडगा काढण्यासाठी वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये ठेकेदारी पद्धतीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून अधिकचे काम करून घेण्याचा प्रयत्न झाला.तरीही प्रामुख्याने सरकारी आरोग्य सेवा कोलमडली आणि शहरासह जिल्हाभरातून उपचारार्थ येणाऱ्या रुग्णांवर वैद्यकीय सेवेसाठी ताटकळत बसण्याची वेळ आली.
हेही वाचा >>>जळगाव : बस-दुचाकी अपघातात तीन युवक जागीच ठार
याशिवाय अन्य कार्यालयामध्येही शुकशुकाट दिसून आला.जिल्हा परिषद,पंचायत समिती आणि अन्य सरकारी निमसरकारी कार्यालयांमध्ये शुकशुकाट असल्याने कुठलीही शासकीय कामे होऊ शकत नाहीत,असे संकेत मिळाले.यामुळे शासकीयकामांच्या पूर्ततेसाठी अनेकांनी संबंधित कार्यालयांमधून काढता पाय घेतला.हा संप कधी संपेल हे सांगणे कठीण असून मागण्या पूर्ण होईस्तोवर कामबंद ठेवून बेमुदत संप सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.