लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक: शहरात आठ जुलै रोजी होणारा शासन आपल्या दारी उपक्रम पुढे ढकलण्यात आला असून आता तो १५ जुलै रोजी होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर तारीख निश्चित केली जाणार आहे. गंगापूर रस्त्यावरील डोंगरे वसतिगृह मैदानात होणाऱ्या या कार्यक्रमासाठी तब्बल ७५ हजार जणांना बसता येईल, असा भव्य जलरोधक मंडप उभारण्यात येणार आहे. यानिमित्ताने सत्ताधारी पक्षांकडून शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे.
राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना देण्याच्या उद्देशाने शासन आपल्या दारी हा उपक्रम राबविला जात आहे. आठ जुलै रोजी तो नियोजित होता. पण, राजकीय घडामोडींनी तो पुढे ढकलणे क्रमप्राप्त ठरल्याचे सांगितले जाते. आता १५ जुलै रोजी त्याचे आयोजन करण्याचा विचार आहे. १७ जुलैपासून पावसाळी अधिवेशनास सुरुवात होत आहे. तत्पुर्वी तो घेण्याच्या दृष्टीने तयारी सुरू झाली आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पालकमंत्री दादा भुसे यांनी बैठक घेतली. डोंगरे वसतिगृह मैदान, संभाजी स्टेडियम आणि तपोवन येथील जागेची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी., मनपा आयुक्त भाग्यश्री बानाईत, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर आदी उपस्थित होते.
आणखी वाचा-विठ्ठलास बडव्यांनी घेरले शब्दप्रयोग चुकीचा, महंत सुधीरदास यांचा आक्षेप
शासन आपल्या दारी कार्यक्रमास सुमारे ७५ हजार लाभार्थी उपस्थित राहणार असल्याचा अंदाज आहे. त्यांची आसन व्यवस्थेसाठी जलरोधक मंडपाची उभारणी करावी लागणार आहे. लाभार्थ्यांची या ठिकाणी ने-आण करण्यासाठी बसचे नियोजन आणि येणाऱ्या वाहनांचा अंदाज घेऊन वाहनतळाची जागा यावर बैठकीत विचार विनिमय झाला. कार्यक्रमासाठी डोंगरे वसतिगृह मैदान जवळपास निश्चित झाले आहे. ही जागा अंतिम करताना लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचे भुसे यांनी यावेळी सांगितले. पाहणी केलेल्या जागांवर वाहनतळ व्यवस्था, वैद्यकीय कक्ष व कार्यक्रमाच्या दृष्टीने अनुषंगिक सोयी-सुविधांच्या व्यवस्थेबाबत भुसे यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली.