मालेगाव : बनावट कागदपत्रे सादर करून जन्म प्रमाणपत्रे प्राप्त केल्याचे प्रकरण दोन महिन्यांपासून मालेगावात गाजत आहे. या बनावट जन्म प्रमाणपत्रांप्रकरणी दाखल गुन्ह्यांच्या चौकशीत महाराष्ट्र शासनातर्फे आता विशेष सरकारी वकील म्हणून शिशिर हिरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हिरे हे मालेगाव येथील रहिवासी आहेत.

राज्यात काही ठिकाणी रोहिंगे आणि बांगलादेशी घुसखोरांनी बनावट जन्म दाखले प्राप्त केल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने मालेगाव तहसील कार्यालयातून बनावट दाखले वितरीत केल्याप्रकरणी मालेगाव छावणी पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मालेगावात सहा महिन्यात चार हजारावर जन्म प्रमाणपत्रे देण्यात आली असून सदर प्रमाणपत्रांचे आदेश मिळवताना संबंधित अर्जदारांनी बनावट दस्त देऊन फसवणूक केल्याचा सोमय्या यांचा आरोप आहे. या दोन्ही गुन्ह्यात आतापर्यंत २० पेक्षा अधिक जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात अधिकारी, कर्मचारी,वकील, दलाल, मध्यस्थ व लाभार्थी यांचा समावेश आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी महाराष्ट्र शासनाने नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथकाची देखील (एसआयटी) स्थापना केली आहे.

बनावट कागदपत्र देऊन जन्म प्रमाणपत्रे प्राप्त केल्याप्रकरणी दाखल असलेल्या या गुन्हयांच्या चौकशी प्रकरणात न्यायालयांत सरकारची बाजू मांडण्यासाठी तसेच एसआयटीचे विधी सल्लागार म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे विशेष सरकारी वकील म्हणून शिशिर हिरे यांची नियुक्ती करण्यात आली. ॲड. हिरे यांनी यापूर्वी महाराष्ट्र शासनातर्फे कोरेगाव भीमा चौकशी आयोग, धुळे दंगल चौकशी आयोग, ललित पाटील ड्रग प्रकरण, अर्णव गोस्वामी खटला, करुणा शर्मा मुंडे खटला, अनिल देशमुख, परमवीर सिंग चौकशी आयोगासह नुकत्याच पुण्यात घडलेल्या पोर्शे कार अपघात प्रकरण, यासारख्या अनेक गुंतागुंतीच्या आणि संवेदनशील खटल्यांमध्ये सरकारची बाजू मांडली आहे.

Story img Loader