राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील संघर्षांचे प्रत्यंतर मंगळवारी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सोहळ्यात आले.
विद्यापीठाशी संलग्न नवीन महाविद्यालय आणि रुग्णालय इमारतीचे लवकरच भूमिपूजन आणि वर्ष-दोन वर्षांत काम पूर्णत्वास नेऊन उद्घाटनदेखील राज्यपालांच्याच हस्ते व्हायला हवे, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले खरे, पण क्षणात कोश्यारी यांनी त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत ना, असे प्रत्युत्तर दिले. त्यावर भुजबळ यांनी आम्ही उद्घाटनावेळी तुमच्यासोबतच राहणार आहोत. तुमचे नाव सांगितल्यावर वजन पडते, अशी कोपरखळी मारली.
महाविकास आघाडी सरकार अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यास तयार नव्हते. यावरून राज्यपालांनी भाषणात सरकारला पुन्हा लक्ष्य करत वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्याची तयारी दर्शविणारे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे गुणगान गायिले.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या प्रशासकीय इमारतीचे आणि सौरऊर्जा प्रकल्पाचे मंगळवारी विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, पालकमंत्री छगन भुजबळ उपस्थित होते.
राज्यपालांचा हा दुसरा नाशिक दौरा. याआधी गेल्या वर्षी आरोग्य विद्यापीठाच्या दीक्षान्त सोहळ्यासाठी ते नाशिकमध्ये आले होते. धार्मिक, सांस्कृतिक अधिष्ठान लाभलेल्या नाशिकमध्ये हवामान एकदम चांगले आहे. त्यामुळे येथे राजभवनसुद्धा बांधावे, असे सुचवत त्यांनी राज्यपालांनी वारंवार नाशिकला यायला हवे, त्यांच्या येण्यामुळे काम वेगाने होईल, अशी टोलेबाजी भुजबळ यांनी केली. कोश्यारी यांनी भुजबळांच्या भाषणाचा संदर्भ देत आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करणे सोपे असते, पण डॉक्टर बनणे कठीण असल्याचे नमूद केले. प्रारंभी विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यास राज्य सरकार तयार नव्हते. तेव्हा आपण सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंशी चर्चा करत होतो. या काळात वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची दूरदृष्टी, बुद्धिमत्तेचा परिचय झाला. त्यांनी परीक्षा घ्यायलाच हवी हे सांगण्याचे धाडस दाखविले. सर्वाच्या सहकार्याने त्यांनी वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या परीक्षा यशस्वीपणे पार पाडल्याचा दाखला कोश्यारी यांनी दिला. योग्य वेळी, योग्य निर्णय घेणाऱ्या देशमुख यांचे कौतुक करत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.