रंगाची बरसात… वेगवेगळ्या वाद्यांवर धरलेला ताल अशा उत्साहपूर्ण वातावरणात सभागृहात नृत्य आणि वाद्याची सुरू असलेली जुगलबंदी तर दुसरीकडे आदिवासी संस्कृतीची झलक दाखवणारे वेगवेगळे कक्ष, खाद्य पदार्थांवर खवय्यांनी मारलेला ताव अशा उत्साहपुर्ण वातावरणात आदिवासी सांस्कृतिक महोत्सवास सुरूवात झाली. यावेळी आदिवासी पथकांनी पारंपरिक वाद्यांवर अनोखे नृत्य प्रकार सादर केले. त्याचा मोह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावीत, विधानसभा उपाध्यक्ष आ. नरहरी झिरवाळ यांना आवरता आला नाही. त्यांनी कला पथकासमवेत ठेका धरल्याचे पहायला मिळाले.
हेही वाचा >>>नाशिक: आदिवासी नृत्याचा राज्यपाल, मंत्र्यांनाही मोह; सांस्कृतिक महोत्सवात धरला ठेका
येथील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानात राष्ट्रीय जनजातीय गौरव दिवसानिमित्त तीन दिवसीय सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात नाशिकसह चंद्रपूर, गडचिरोली, नंदुरबार, धुळे आदी भागातून आदिवासी बांधव सहभागी झाले. महोत्सवात दाखल होण्यासाठी जिल्हाच्या कानाकोपऱ्यातून आदिवासी बांधवांनी मिळेल त्या वाहनाने कार्यक्रम स्थळ गाठले. येणाऱ्यांचे स्वागत करण्यासाठी आदिवासी बांधव उत्सुक होते. सभागृहात प्रवेश करतानाच आदिवासी कला पथकांच्या नृत्याने सर्वांचे लक्ष वेधले. ढोल, पावरी, ठाकर, सांबळ, तारपा आदी पारंपारिक वाद्यांच्या मदतीने पथकांनी तामडी नृत्य, तूर नृत्य असे वेगवेगळे प्रकार सादर केले. आदिवासी बांधवांची अनोख्या नृत्यशैलीला सर्वांनी उत्स्फुर्त दाद दिली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी या नृत्याने चकीत झाले. त्यांच्यासह आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावीत, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी कला पथकाच्या तालावर ठेका धरला. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्याला दाद दिली.
हेही वाचा >>>नाशिक: मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी घोषणाबाजी
दरम्यान, मुख्य सभागृहाच्या बाजुला बचत गटासह आदिवासी संस्कृतीचा परिचय देणारे वेगवेगळे कक्ष उभारण्यात आले आहे. त्यातआदिवासी खाद्यसंस्कृती, कला, रानभाज्या, कडधान्य, कलाकुसरीच्या वस्तू, हाताने निर्मिलेल्या बांबुच्या वस्तू आदींचे प्रदर्शन भरवण्यात आले. या प्रदर्शनाला राज्यपाल कोश्यारी यांनी भेट दिली. त्यांनी बांबुच्या काड्यांपासून तयार केलेली टोपी खरेदी करत पालकमंत्री दादा भुसे यांना भेट दिली. नागरिकांनीही आदिवासी खाद्यपदार्थांवर ताव मारत एका वेगवेगळ्या मेजवानीचा आस्वाद घेतला.