नाशिक – जगातील अनेक प्रगत देश त्यांची भाषा जाणणाऱ्या कुशल मनुष्यबळाची मागणी करतात. या पार्श्वभूमीवर, जपानी, जर्मन, रशियन, इटालियन, फ्रेंच, इंग्रजी या भाषांमध्ये लघु अभ्यासक्रम सुरू करण्याचा विचार मुक्त विद्यापीठाने करावा, अशी सूचना राज्यपाल तथा कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी केली.
येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात राज्यपाल राधाकृष्णन यांनी मार्गदर्शन केले. भारतामध्ये २०३६ पर्यंत उच्च शिक्षणात ५० टक्के नोंदणी साध्य करण्याचे स्वप्न फक्त मुक्त आणि दूरस्थ शिक्षण क्षमतेचा वापर करूनच साकारता येईल, असा विश्वासही राधाकृष्णन यांनी व्यक्त केला.
यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अशोक कोळस्कर यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे यापूर्वी कधीही उपलब्ध नसलेल्या संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होत असल्याकडे लक्ष वेधले. मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी, मुक्त विद्यापीठ डिजिटल विद्यापीठात परिवर्तित करण्यासाठी प्रयत्न होत असून तसे झाल्यास एक कोटी विद्यार्थ्यांशी विद्यापीठ जोडले जाईल, असे नमूद केले.
पदवीधारकांमध्ये ३३ बंदीजन
दीक्षांत समारंभात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील ९६ शिक्षणक्रमांतील एक लाख ३९ हजार २१८ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. पदवीधारकात ६० वर्ष वयावरील १९५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विविध शिक्षणक्रम पूर्ण करून पदवी मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कारागृहांमध्ये शिक्षा भोगत असलेल्या ३३ बंदीजनांचा समावेश आहे.
महिन्यातून एक दिवस शासकीय रुग्णालयांसाठी द्या
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत २४ वा दीक्षांत समारंभ झाला. यावेळी त्यांनी आयुष्यात कितीही मोठे यश वैद्यकीय सेवेत मिळाले तरी समर्पण भाव ठेवून सर्वसामान्य रुग्णांशी नाळ जोडून ठेवण्याचे आवाहन करतानाच महिन्यातून एक दिवस तरी शासकीय रुग्णालयांमध्ये सेवा द्यावी, असा सल्ला दिला. या समारंभात ८५४७ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आल्या. विविध विद्याशाखांमधील गुणवत्ता प्राप्त केलेल्यांना १३९ सुवर्णपदक, एका विद्यार्थ्यांस रोख रक्कम पारितोषिक, संशोधन अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या १५ विद्यार्थ्यांना पीएच.डी. प्रदान करण्यात आली.