नाशिक – विद्यार्थ्यांना प्रगती करण्यासाठी विविध क्षेत्रांची कवाडे खुली झाली आहेत. आता, तुम्ही सर्व करिअरच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहात. प्रत्येक दिवस नवीन आव्हाने आणि नवीन धडे घेऊन येईल. ही आव्हाने संधी म्हणून स्वीकारण्यास सज्ज व्हा, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. येथील संदीप विद्यापीठाचा प्रथम दीक्षांत समारंभ राज्यपाल बैस यांच्या उपस्थितीत झाला.याप्रसंगी व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलगुरू पंडित नित्यानंद झा, अध्यक्ष डॉ. संदीप झा, उपकुलगरु डॉ. राजेंद्र सिन्हा, माजी खासदार प्रभात झा, अलोक झा, आर्यन झा आदी उपस्थित होते.

हेही वाचा >>> जळगावात दुचाकी अपघातात वृद्धासह महिलेचा मृत्यू

यावेळी बैस यांनी, देशाचे भविष्य तरुणांच्या हाती असून ही तरुणपिढी उद्याच्या भारताचे नेतृत्व करणार असल्याचे सांगितले. वेळेचे योग्य नियोजन केल्यास जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यश मिळवता येते. ज्ञानाचा विस्तार करण्यासह उद्दिष्टे निश्चित करणे, कौशल्ये सुधारणे आणि खुल्या संधीचा पुरेपूर वापर करण्यासाठी आतापासूनच वेळेचे नियोजन करावे, असा सल्लाही राज्यपाल बैस यांनी विद्यार्थ्यांना दिला.

ध्येय ठरवताना अपयश आल्यास घाबरू नका. अपयश हा जीवनाचा एक भाग आहे, जीवनाचा शेवट नाही. त्यामुळे अपयशापुढे खचू नका.अपयशाला संधी म्हणून स्वीकारुन त्याच संधीच्या बळावर यश मिळवता येते, असे त्यांनी नमूद केले. विद्यापीठाचे अध्यक्ष संदीप झा यांनी, प्रत्येकात एक विशिष्ठ गुणवत्ता असते. तिचा विकास करणे हे त्यांच्या हातात असते, असे सांगितले.