यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या चर्चासत्रातील सूर
शासकीय उदासीनतेमुळे महाराष्ट्रातील साहित्य, संस्कृती व कला क्षेत्रांतील पर्यावरण ढासळत असल्याचा सूर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने येथे आयोजित चर्चासत्रातून निघाला.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘महाराष्ट्र २०२५’ चर्चासत्रातील सातवे चर्चासत्र ‘साहित्य, संस्कृती व कला : सामाजिक पर्यावरण आणि शासकीय धोरण’ या विषयावर कुसुमाग्रज प्रतिष्ठानात झाले. मकरंद हिंगणे यांनी सध्याच्या अस्थिर कालखंडात हे चर्चासत्र पार पडत असल्याचे महत्त्व सांगितले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे शरद काळे यांनी या चर्चासत्रामागील भूमिका मांडली. साहित्य, कला या जीवन समृद्ध करणाऱ्या धारा आहेत. त्याचे जतन आणि संवर्धन करण्यास समाजाने नेहमीच महत्त्व दिले असल्याचे त्यांनी नमूद केले. वनाधिपती विनायकदादा पाटील यांनी कोणत्याही कलाकृतीच्या मागे ठामपणे उभे राहणे हे राज्यकर्त्यांचे काम असल्याचे ठणकावले. शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांच्याप्रमाणेच हे काम केले. ‘घाशीराम कोतवाल’, ‘पुरुष’, ‘सिंहासन’ या कलाकृतींना झालेल्या विरोधावेळी त्यांनी ठाम भूमिका घेतली होती, हे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
चर्चासत्राच्या बीजनिबंधाचे सादरीकरण साहित्यिक संजय जोशी यांनी केले. संगीत क्षेत्रात नाटय़संगीताने आपला कान तयार केला, पण दृश्यकलेच्या बाबतीत मात्र आपले डोळे तयार झाले नसल्याचे त्यांनी नमूद केले. ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी लेखकाचा शब्द जिथे गंभीरपणे घेतला जातो तिथे साहित्याची जागा महत्त्वाची असते, असे सांगितले. वेगवेगळ्या भाषेतील साहित्य आपल्याकडे आले पाहिजे, आपले तिकडे गेले पाहिजे. हे सातत्याने घडण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. ‘नाटक’ या विषयावर ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर यांनी विचार मांडले. रंगभूमीला आज अनुदान नाही. परदेशात या प्रकारच्या उपक्रमांना कॉर्पोरेट सहकार्य मिळते. विद्यापीठात नाटय़विषयक केंद्रे सुरू आहेत, पण ती बऱ्यापैकी तोटा सहन करून आहेत. कोणतीही शासकीय मदत या केंद्रांना मिळत नाही. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे केंद्र नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी मैफल, नाटय़प्रयोग यांचे आयोजन करते. अशा प्रकारच्या प्रयत्नांना अधिक बळ मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
चित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी मराठी चित्रपटांच्या सद्य:स्थितीवर भाष्य केले. मराठी चित्रपट गेल्या काही वर्षांत तांत्रिक अंगांनी समृद्ध झाले. मल्टिप्लेक्सवर आज बव्हंशी सिनेमा चालणे अवलंबून आहे. दुर्दैवाने प्रेक्षकांच्या अग्रक्रमावर मराठी सिनेमा नाही. शासकीय पातळीवर उदासीनताही त्यांनी मांडली. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट वितरित होण्यासाठी अडथळे निर्माण होतात. मराठी चित्रपट अधिकाधिक पुढे नेण्यासाठी शासकीय प्रयत्नाबरोबर प्रेक्षकांचीही तितकीच जबाबदारी असल्याचे त्यांनी मांडले. ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुलकर यांनी चित्र आणि शिल्पकलेला उत्तेजन दिले जात नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. इतर राज्यांत या कलाकारांचा यथायोग्य गौरव होतो. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाते. आपल्याकडे मात्र दृश्यकलेबाबतीत अनास्था दिसून येते. शासकीय धोरण बदलण्याची गरज आहे. त्याची किमान सुरुवात यानिमित्ताने झाली हे सुचिन्ह आहे, असे बहुलकर यांनी नमूद केले. पं. सत्यशील देशपांडे यांनी भारतीय संगीताची वैशिष्टय़े, जगाच्या पाठीवर तिचे असलेले महत्त्व सांगितले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे हेमंत टकले यांनी प्रतिष्ठानची या चर्चासत्रामागील भूमिका मांडली. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे हेही या वेळी उपस्थित होते. सदा डुंबरे यांनी आभार मानले.

Story img Loader