जिल्हाधिकाऱ्यांनी खडसावल्यानंतर यंत्रणा कार्यप्रवण

जिल्ह्य़ातील तब्बल २२१ गावे आणि ७९८ वाडय़ांना २८२ टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा, टँकरच्या फेऱ्या आदींवर जीपीएस यंत्रणेमार्फत लक्ष ठेवण्याविषयी अनभिज्ञ असणाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी धारेवर धरल्यानंतर दुसऱ्या दिवशी समस्त यंत्रणा कामाला लागली आहे. यासंबंधीचे ‘युजर नेम’ आणि ‘पासवर्ड’ मिळाल्यानंतर शुक्रवारी प्रांताधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील टँकरचे जीपीएस ‘ट्रॅकिंग’ सुरू केले. या माध्यमातून टँकरच्या फेऱ्या, पाणीपुरवठय़ातील त्रुटी आदी तत्सम बाबींची स्पष्टता होण्यास हातभार लागणार आहे.

दुष्काळी स्थितीमुळे जिल्ह्य़ात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा टँकरची संख्या पाच पटीने वाढण्याच्या मार्गावर आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्य़ातील एक हजार १० गावे, वाडय़ांना २८२ टँकरमधून पाणीपुरवठा केला जातो. पाण्याचे उपलब्ध स्रोत संपुष्टात येऊ लागल्याने टंचाईला तोंड देणाऱ्या गावांची संख्या वाढत आहे. कोणत्याही गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू करावयाचा असल्यास प्रथम त्यावर जीपीएस यंत्रणा असणे बंधनकारक आहे. ही यंत्रणा असल्याशिवाय टँकर मंजूर होत नाही.

जिल्ह्य़ात सध्या कार्यरत २८२ टँकरद्वारे दररोज ६५० फेऱ्या केल्या जात असल्याची कागदोपत्री नोंद आहे, परंतु त्यानुसार पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी आहेत. दुष्काळी स्थितीच्या आढावा बैठकीत हा मुद्दा उपस्थित झाला होता. जीपीएस यंत्रणेबाबत अधिकारी अनभिज्ञ असल्याचे उघड झाले होते. जीपीएस यंत्रणेवर स्थानिक अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्याचे निदर्शनास आले.

पाणीपुरवठा विभागामार्फत टँकरवर मध्यवर्ती केंद्रातून नियंत्रण ठेवले जाते, परंतु स्थानिक अधिकाऱ्यांचे नियंत्रण गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी नमूद केले होते. पाणीपुरवठा विभागाकडील टँकरवरील जीपीएस यंत्रणेसंबंधीचा ‘युजरनेम’ आणि ‘पासवर्ड’ सर्व प्रांताधिकाऱ्यांना देण्याची सूचना करण्यात आली होती. टँकरवरील जीपीएस कार्यप्रणालीचे पासवर्ड हाती पडल्यानंतर शुक्रवारी सकाळपासून सर्व तालुक्यांतील प्रांताधिकारी कार्यप्रवण झाले.

याद्वारे पाणीपुरवठय़ातील त्रुटी, फेऱ्यांची संख्या, स्थळ आदींचे अवलोकन केले जात आहे. मध्यवर्ती यंत्रणेकडे युजर आणि पासवर्ड असल्याने स्थानिक अधिकाऱ्यांकडे ती माहिती नव्हती. सर्व अधिकाऱ्यांना जीपीएस यंत्रणा हाताळता येते. पासवर्ड आणि त्यासंबंधीची माहिती मिळाल्यानंतर जिल्ह्य़ातील टँकरच्या दैनंदिन फेऱ्या, स्थळ आदींवर स्थानिक अधिकारी लक्ष देऊ लागले आहे. त्यांच्याकडून त्यासंबंधीचे अहवाल प्राप्त होत असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.

गैरप्रकार उघड होणार

टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व म्हणजे २८२ टँकरवर जीपीएस यंत्रणा आहे. या टँकरमार्फत दररोज ६५० हून अधिक फेऱ्या केल्या जातात. टँकरद्वारे सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याच्या काही भागांतून तक्रारी आहेत. टँकरच्या फेऱ्या, पाणी भरण्याचे स्रोत आणि पुरविले जाणारे स्थळ अर्थात गाव यांची माहिती जीपीएसद्वारे यंत्रणेला लगेच उपलब्ध होते. त्यावर नजर ठेवून टँकरच्या पाणीपुरवठय़ावर नियंत्रण ठेवता येते. प्रत्येक टँकर किती फेऱ्या मारते याची स्पष्टता होईल. काही गैरप्रकार होत असल्यास ते लक्षात येतील. दुष्काळी परिस्थितीत टँकरचालक नागरिकांना पाणीपुरवठा करण्याऐवजी हे पाणी अन्यत्र विक्री करत असेल तर ठेकेदारासह संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश आधीच दिले गेले आहे.