लोकसत्ता वार्ताहर
मनमाड: शहरजवळील नागापूर येथील इंडियन ऑईल कंपनीच्या इंधन साठवणूक प्रकल्पात शुक्रवारी पहाटे डिझेल पाईप लाईनची मोठ्या प्रमाणावर गळती झाल्याने विस्कळीत झालेला राज्यातील इंधन पुरवठा शनिवारी हळूहळू सुरळीत होऊ लागला आहे. कंपनीच्या अहमदनगर येथील प्रकल्पातून पर्यायी इंधन पुरवठा सुरू आहे.
बॉटम लोडिंग पध्दतीने दररोज भरल्या जाणाऱ्या कंत्राटदारांचे ९० आणि वितरकांचे ३० याप्रमाणे एकूण १२० इंधन टँकर तेथून भरून देण्यात आले. तर मनमाड येथील बीपीसीएल प्रकल्पात टॉप लोडिंग पद्धतीने इंधन भरण्याची सोय असल्याने पर्यायी व्यवस्थेत तेथे इंडियन ऑइलच्या वितरक व कंत्राटदारांचे सुमारे १४० टँकर भरून दिले जात आहेत. दरम्यान, नागापूर इंडियन ऑइल प्रकल्पात जेथे पाईप फुटून गळती झाली, तेथील दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. हे काम सोमवारी सायंकाळपर्यंत सुरू राहील. मंगळवारपासून इंधन पुरवठा पूर्ववत होईल, अशी माहिती देण्यात आली. इंधन गळतीमुळे कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगितले जाते.
आणखी वाचा-देवेंद्र फडणवीस खोटारडे, ललित पाटील शाखाप्रमुखही नव्हता, ठाकरे गटाचा दावा
शुक्रवारी पहाटेपासून राज्यांत विविध ठिकाणी इंडियन ऑईल प्रकल्पांतील टँकरद्वारे वितरीत होणार्या डिझेल व पेट्रोल वाहतूकीवर तसेच वितरणावर मोठा परिणाम झाला होता. तो हळूहळू पूर्ववत होत आहे. या प्रकाराबाबत व्यवस्थापनाने कुठलीही अधिकृत माहिती दिली नाही. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ही गळती झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी पोलिसांकडे तक्रार देऊन केला आहे. गळतीमुळे स्थानिकांमध्ये घबराट पसरली.