राज्यातील प्रकल्प गुजरातमध्ये गेले. लोकांच्या हातातील रोजगार जात आहे. लोकांच्या मनात याविषयी संताप आहे. देशातील न्यायव्यवस्था न्याय द्यायला विलंब करत आहे. लोकशाहीचे चार स्तंभ डळमळीत होत असतांना पदवीधरांनी अंतर्मूख होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन खासदार अरविंद सावंत यांनी केले.
हेही वाचा- नाशिकमध्ये ठाकरे-शिंदे गटातील वादातून हवेत गोळीबार; जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांचा लाठीमार
येथे महाविकास आघाडीच्यावतीने नाशिक विभाग पदवीधर मतदार संघातील उमेदवार शुभांगी पाटील यांच्यासाठी आयोजित मेळाव्यात खासदार सावंत बोलत होते. मेळाव्यास शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई, खा. विनायक राऊत, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, प्रेरणा बलकवडे यांच्यासह काँग्रेसच्या हेमलता पाटील यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी सावंत यांनी गेल्या काही दिवसात देशाचे राजकारण वेगळ्याच पातळीवर पोहचले असल्याचे सांगितले. भारतीय जनता पक्ष भांडणे लावण्याचे काम करत आहे. भाजपाला सत्तेची नशा चढली आहे. देशात जात-धर्म यामध्ये वाद लावले जात आहेत. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली. कोणीतरी जोडण्याचा विचार करीत असल्याने यात्रेत सहभागी झालो. ही निवडणुक सुसंस्कृत लोकांची आहे. सक्त वसुली संचालनालयाचे भारतीय जनता पक्षाच्या एकाही पदाधिकाऱ्यावर छापे पडलेले नाहीत, याकडे सावंत यांनी लक्ष वेधले. सुभाष देसाई यांनी उध्दव ठाकरे यांचे खच्चीकरण करण्यासाठी पंतप्रधानांसह देशाचे गृहमंत्री सर्वजण मैदानात उतरले असल्याचे सांगितले. भाजपाकडे पात्र उमेदवार नसल्याने इतर पक्षांकडून केवळ पळवापळवी करत राहतात. नाशिक विभागात पदवीधर मतदार संघाच्या बाबतीत जे घडले त्यातील काळेबेरे समोर येईलच. महाविकास आघाडी मजबूत आहे, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा- सप्तश्रृंगीदेवी मंदिराचे लवकरच नुतनीकरण, गडावरील ग्रामस्थ, कर्मचाऱ्यांना आरोग्य सुरक्षा कवच
उमेदवार शुभांगी पाटील यांनी लढत मोठी असून विश्वास ठेवा, असे आवाहन केले. काँग्रेसच्या हेमलता पाटील यांनी भाजपाकडून येणाऱ्या दबावामुळे शिवसेनेशी एकनिष्ठ आणि पक्षाशी प्रामाणिक राहण्याचा सल्ला उमेदवार पाटील यांना दिला. शिवसेना आणि काँग्रेस संक्रमण काळातून जात असून यातून दोन्ही पक्ष तावून सुलाखून निघतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.