वारंवार संधी देऊनही ग्रामपंचायतीच्या एक कोटी ७३ लाख कराची थकबाकी भरण्यास टाळाटाळ केल्याने चॉकलेटसाठी प्रसिध्द असलेल्या तालुक्यातील रावळगाव येथील कारखान्याचे कार्यालय आणि गोदाम गोठविण्याची कारवाई करण्यात आली आहे. रावळगाव येथील चॉकलेट आणि ॲक्रो इंडिया या कारखान्याने अनेक वर्षे ग्रामपंचायतीच्या पाणीपट्टी, घरपट्टी या करांचा भरणा केलेला नाही. त्यामुळे थकबाकीची ही रक्कम वाढत गेली. सद्यस्थितीत या दोन्ही कारखान्यांकडे ग्रामपंचायतीची एक कोटी ७३ लाख रुपयांची रक्कम थकीत आहे.
हेही वाचा >>> कामगारांच्या वेतनाची रक्कम पळविणाऱ्यास अटक; सिन्नर औद्योगिक पोलिसांची कामगिरी
या थकबाकीच्या वसुलीसाठी ग्रामपंचायतीने कारखाना व्यवस्थापनाकडे वारंवार पाठपुरावा केला. वसुलीसाठी नोटिसा देण्यात आल्या. तसेच तडजोडीसाठी लोकअदालतीतही हे प्रकरण ठेवण्यात आले होते. मात्र कारखाना प्रशासनाने योग्य तो प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे थकबाकीच्या वसुलीसाठी जप्तीची कारवाई करण्याची नोटीस ग्रामपंचायतीमार्फत नुकतीच देण्यात आली होती. जप्तीच्या नोटिसीलाही कारखाना व्यवस्थापनाने प्रतिसाद न दिल्याने सरपंच महेश पवार, उपसरपंच भरत आखाडे, ग्रामविस्तार अधिकारी एस.बी.बच्छाव यांच्यासह ग्रामपंचायतीच्या अन्य सदस्यांनी कारखान्याचे गोदाम व कार्यालय गोठविण्याची कारवाई केली. कारखान्याच्या जंगम मालमत्तेची जप्ती केल्यावर थकबाकी वसूल होणे शक्य नसल्याने पहिल्या टप्प्यात कारखान्याचे कार्यालय व गोदाम गोठविण्याची कारवाई करण्यात आली. यानंतरच्या टप्प्यात स्थावर मालमत्ता जप्तीची कार्यवाही करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या कायद्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करण्यात येणार असल्याचे सरपंच महेश पवार यांनी सांगितले.