जळगाव : गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे महात्मा गांधी पुण्यतिथी अर्थात हुतात्मा दिनी (३० जानेवारी) भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त गांधी विचार प्रचार-प्रसारासाठी ग्रामसंवाद सायकल यात्रा काढण्यात येणार आहे. १३ दिवस चालणारी ही यात्रा जळगाव जिल्ह्याच्या दक्षिण-पश्चिम भागातील जळगाव, एरंडोल, पारोळा, भडगाव, चाळीसगाव, पाचोरा, जामनेर या तालुक्यांतून सुमारे ३५० किलोमीटरचा प्रवास करणार आहे. यात्रेच्या माध्यमातून एक लाख विद्यार्थी आणि नागरिकांशी संवाद साधण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

समाजातील सहभागाने ही सायकल यात्रा यशस्वी करण्याचे नियोजन सुरु आहे. सायकल यात्रेत विविध राज्यांतून येणारे व स्थानिक स्वयंसेवकांचा सहभाग असणार आहे. या सहभागी स्वयंसेवकांसाठी संबंधित कालावधीत वापरासाठी सायकलींची आवश्यकता आहे. त्यासाठी आपल्याकडील चालू स्थितीतील व प्रवासासाठी योग्य सायकल उपलब्ध करून द्यावी. सायकल यात्रेनंतर सायकल योग्य स्थितीत परत करण्यात येईल. सायकल वापरण्यायोग्य करण्यासाठी काही दुरुस्ती करावी लागणार असल्यास त्याबाबतही कळविण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सायकलसह यात्रेच्या मार्गावरील गावांतील शाळा-महाविद्यालयात कार्यक्रम, स्थानिक पातळीवर रात्री गावकर्यांसाठी कार्यक्रमांचे आयोजन, सकाळी गावात प्रभातफेरी आदी माध्यमांतून स्थानिक नागरिक सहभाग नोंदवू शकतील. सहभागी स्वयंसेवकांचा नाश्ता, दुपारचे व सायंकाळचे जेवण आदी विषयांतही आपला सहभाग नोंदवू शकणार आहे. अधिक माहितीसाठी सुधीर पाटील (९८२३३६२३३०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gramsamwad cycle yatra organized by gandhi research foundation ysh