जळगाव : गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात, गुलालाची उधळण आणि ढोल-ताशांच्या दणदणाटात जिल्ह्यात मंगळवारी लाडक्या गणेशाचे आगमन झाले. गणपतीला घरी घेऊन जाण्यासाठी भक्तांनी गर्दी केली. सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. या निमित्ताने बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल झाली. लाडक्या गणेशाची वाट पाहणार्या भक्तांनी सकाळपासूनच बाजारपेठेत गर्दी केली होती. गणेशाला घरी नेताना आबालवृद्धांचा उत्साह द्विगुणित झाला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुलाल आणि फुलांची उधळण करत सर्वत्र जयघोष केला जात होता. शहरातील मध्यवर्ती भागातील फुले व्यापारी संकुल, अजिंठा चौफुली, रिंग रोड, बहिणाबाई उद्यान, पिंप्राळा उपनगर, महाबळ परिसर, छत्रपती शिवाजी महाराजनगर, खोटेनगर, गणेश कॉलनी यांसह विविध उपनगरांत मूर्तींसह पूजा साहित्यांच्या दुकानात गर्दी उसळली होती. भक्तांच्या गर्दीने शहरातील बाजारपेठेसह उपनगरांतील रस्ते फुलले होते. यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे भक्तांचा अधिक कल दिसून आला. त्यामुळे शाडू मातीच्या गणेशमूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. अलंकारांनी मढलेली मूर्ती खरेदी करण्यास प्राधान्य दिले जात होते.

हेही वाचा : धुळ्यात धनगर समाज महासंघाची निदर्शने

गणेश मंडळांनी पारंपरिक वाद्यांना पसंती दिली. शहरातील महत्त्वाच्या गणेश मंडळांसह तालुक्यातील गणेश मंडळांनीही ढोल-ताशा पथकांना आमंत्रित करीत श्रींची मिरवणूक काढली. दुपारनंतर मंडळांच्या मिरवणुकांनी रस्ते परिसर गजबजला होता. शहरात सुमारे दीड हजारावर ढोल-ताशा पथके असून, ढोल-ताशा पथकांचा दर पाचशे ते अडीच हजारांपर्यंत आहे. एका पथकात आठ ते दहा जणांचा समावेश असतो. मोठ्या मंडळांसाठी लागणार्या ढोल-ताशा पथकांत सुमारे २५ ते ५० जणांचा समावेश असतो. त्यांचा दर १० हजार ते ५० हजारांपर्यंत होता, असे व्यावसायिक सलीम पिंजारी यांनी सांगितले.

हेही वाचा : जळगाव जिल्ह्यातील नुकसानीचे आठवड्याच्या आत सर्व पंचनामे पूर्ण करा, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

गणेशोत्सव शांततेत पार पडावा, यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. मंगळवारी शहरात सर्वत्र पोलिसांचा फौजफाटा तैनात होता. मुख्य बाजारपेठेसह टॉवर चौक, सुभाष चौक, सराफ बाजार, शनिपेठ, बहिणाबाई उद्यान, रिंग रोड, अजिंठा चौफुली, इच्छादेवी चौक, गणेश कॉलनी चौक यांसह उपनगरांतील बाजारांत बंदोबस्त तैनात होता. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून शहर वाहतूक शाखेने नियोजन करत मुख्य रस्त्यांवर मोठी वाहने उभी करण्यास मनाई केली.

हेही वाचा : धुळ्यासह नेर, कुसुंब्यात पोलिसांचे संचलन, राखीव दलाचाही सहभाग

कोट्यवधींची उलाढाल

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने बाजारपेठेत मोठी उलाढाल झालीू. मिठाईच्या दुकानांमध्ये विविध प्रकारचे मोदक, बर्फी, श्रीखंड, बासुंदी, जिलबी आदी खरेदीसाठी भक्तांची झुंबड उडाली. दुग्धजन्य पदार्थ विक्रीतून दोन कोटींची उलाढाल झाल्याचे व्यावसायिक अतुल बारी यांनी सांगितले. जास्वंद, गुलाब, केवडा, मोगरा, शेवंती, झेंडूची फुले, दुर्वा, धूप, अगरबत्ती यांसह पूजा साहित्याची सर्वत्र खरेदी सुरू होती. झेंडूची फुले ५० ते ८० रुपये प्रतिकिलो, तर इतर फुलांचा दर प्रतिपाव २०० रुपयांवर गेला होता. पूजा साहित्यासह फुलांच्या विक्रीतून अंदाजे ७० ते ८० लाखांची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यावसायिक योगेश महाजन यांनी वर्तविला. गणेशोत्सवात फळांनाही मोठी मागणी आहे. सफरचंद, डाळिंब, सीताफळ, संत्री, मोसंबी, केळी, चिकू, पेरू, पपई यांसह विविध फळे बाजारपेठेत उपलब्ध होते. त्यांचे दर प्रतिकिलो २०० रुपयांपर्यंत होते. हरितालिका व गणेशोत्सवासाठी फळांच्या बाजारपेठेत दीड ते दोन कोटींची उलाढाल झाल्याचे आपला माणूस फ्रूटसचे परिस महाराज व सागर महाराज यांनी सांगितले.

हेही वाचा : सिन्नरमध्ये जिंदालचा नवीन प्रकल्प; पेट्रोलियम उद्योगासाठी सामग्रीची देशात निर्मिती

वाहन, इलेक्ट्रॉनिक्स, सुवर्ण बाजारातील विक्री सुसाट

ग्राहकांनी गणेश चर्तुथीच्या मुहूर्तावर खरेदीचा योग साधला. अनेकांनी गृहपयोगी वस्तुंसह, सोन्या-चांदीचे दागिने, वाहन, वातानुकूलीत यंत्रणा, भ्रमणध्वनी, संगणक व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची खरेदी केली. या दिवशी दुचाकी विक्रीतून मोठी उलाढाल झाली. एका दालनात विविध प्रकारच्या ३५ दुचाकी विक्री झाल्याचे व्यवस्थापक विवेक जोशी यांनी सांगितले. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या विक्रीतून शहरात सुमारे दोन कोटींपेक्षा अधिक उलाढाल झाल्याचा अंदाज अनमोल इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक मयूर मोतीरामानी यांनी सांगितले. सुवर्ण बाजारातही कोट्यवधींची उलाढाल झाल्याचे सांगण्यात आले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Grand celebration at jalgaon on arrival of ganesha ganeshotsav 2023 crowd at markets css