नाशिक – जिल्ह्यात अनेक भागांत सलग दुसऱ्या दिवशी मेघ गर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने कांदा, मिरचीसह अन्य पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. चांदवड, पिंपळगाव, निफाडसह अनेक भागांत पावसाने निर्यातक्षम द्राक्षांची काढणी थांबली. परिपक्व होण्याच्या मार्गावर असलेल्या द्राक्षांना तडे जाण्याची भीती व्यक्त होत आहे. शहरातील काही भागांत रात्रीपासून खंडित झालेला वीज पुरवठा सोमवारी पूर्ववत होऊ शकला नाही.
अवकाळी पावसाने बागलाण, कळवण, नांदगाव, निफाड, चांदवड, नाशिक, अभोणासह अनेक भागांत हजेरी लावली आहे. काही भागांत तो रिमझिम स्वरुपात कोसळत आहे. अकस्मात आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. बागलाणमधील वटार, चौंधाणे, विरगाव, चिंचुरे, कंधाने परिसरात कांदा व मिरचीचे नुकसान झाले. वातावरणातील बदलाने द्राक्ष उत्पादकांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे. सध्या द्राक्ष परिपक्व होण्याच्या मार्गावर असून, अनेक ठिकाणी खुडणी होत आहे. निर्यातक्षम बागेत द्राक्ष घडांना कागद गुंडाळला जातो. पावसात हे कागद भिजले, द्राक्ष ओली झाली की ओलसर द्राक्षांची निर्यातदार खुडणी करीत नाही. त्यामुळे ज्या भागात पाऊस झाला, तेथील द्राक्षांची एक-दोन दिवस निर्यात थांबल्याचे द्राक्ष बागाईतदार संघाचे विभागीय अध्यक्ष रवींद्र निमसे यांनी सांगितले.
हेही वाचा – होळी करा लहान, पोळी करा दान महाराष्ट्र अंनिसचे आवाहन
ऊन पडेपर्यंत या बागांंमधील द्राक्ष निर्यातीसाठी पाठविता येणार नाही. अधिक पाऊस झाल्यास द्राक्षांना तडे जाऊ शकतात. ही बाब दोन-तीन दिवसांनी लक्षात येते. द्राक्ष घडांवर प्रथम तांबुटसर रंग दिसतो. तसे आढळल्यास तडे जाण्याची शक्यता बळावते, असा दाखला निमसे यांनी दिला. सध्या द्राक्षाचा हंगाम खऱ्या अर्थाने सुरू झाला आहे. या काळात अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणाने हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाऊ शकतो, अशी भीती उत्पादकांना आहे.
हेही वाचा – नाशिक : जिल्ह्यात तीन ठिकाणी घरफोडी
पावसाने अनेक भागांतील वीज पुरवठा विस्कळीत झाला. मध्यरात्रीपासून विजांच्या कडकडाटात पाऊस पडत आहे. काही भागांतील वीज पुरवठा सकाळी पूर्ववत झाला. मात्र अमृतधामसह आसपासच्या काही भागांत अकरा वाजेपर्यंत वीज गायब होती.