अनिकेत साठे, लोकसत्ता
नाशिक : केवळ द्राक्षापासून तयार होणाऱ्या वाइनची ओळख आता बदलण्याच्या मार्गावर असून विविध फळांपासून वाइन निर्मितीचे प्रयोग सुरू झाले आहेत. त्याअंतर्गत देशात पहिल्यांदाच जांभळापासून वाइन तयार करण्यात आली. आदिवासी बचत गटांच्या मदतीने राज्यातील जंगल परिसरातून जांभूळ संकलन केले जाते. ही वाइन तयार करताना कोकणातील सावंतवाडी भागातील जांभळांना अव्वल स्थान दिले जात आहे. तेथील जांभळांच्या वाइनला चांगली चव आणि रंग प्राप्त होतो. त्यामुळे त्यापासून निर्मिलेल्या वाइनची वेगळी ओळख उत्पादकांनी निर्माण केली आहे.
राज्यात आजवर विशिष्ट प्रकारच्या द्राक्षांपासून वाइन मुख्यत्वे तयार केली जाते. वर्षांकाठी हे प्रमाण सव्वा ते दीड लाख कोटी लिटरच्या घरात आहे. मध्यंतरी शासनाने अन्य फळे आणि धान्यापासून वाइन निर्मितीला प्रोत्साहन देण्याचे ठरवले. त्याची फलश्रुती द्राक्ष वाइनच्या स्पर्धेत जांभूळ वाइन दाखल होण्यात झाली. पुढील काळात अन्य फळांच्या वाइनशी द्राक्ष वाइनला स्पर्धा करावी लागणार आहे. वाइनसाठी सर्वप्रथम जांभूळ या फळाची निवड होण्यामागे उत्पादकांचा व्यावसायिक दृष्टिकोन आहे. जांभूळ हे मधुमेह, हृदयविकार आणि पचन विकारावर उपयुक्त मानले जाते. हंगामात हे फळ जेमतेम दोन-तीन महिने उपलब्ध असते. मधुमेहींकडून त्याला प्रचंड मागणी असल्यामुळे शहरी भागात दरही चांगले मिळतात. या फळावर प्रक्रिया करून त्याचा वर्षभर उपयोग करण्याचे गणित वाइन उत्पादकांनी ठेवले आहे. विविध पातळीवर संशोधन करून देशात प्रथमच जांभळापासून वाइनची निर्मिती करण्यात यश आल्याचे रेझवेरा वायनरीजचे सहसंस्थापक निखिल खोडे आणि कोमल सोमाणी यांनी नमूद केले. नव्या प्रकारच्या वाइनची चव वाइनप्रेमींपर्यंत पोहोचविण्यासाठी येथे खास केंद्र उघडण्यात आले आहे.
राज्यातील बहुतांश भागात जांभूळ आढळते. ते प्राप्त करण्यासाठी उत्पादकांनी आदिवासी बचत गटांची मदत घेतली. भंडारा, नागपूर, महाबळेश्वर, सावंतवाडी आदी भागातून जांभळांचे संकलन करण्यात आले. जांभळाच्या प्रकारांविषयी संशोधन कमी आहे. निर्मिती प्रक्रियेत सावंतवाडीतील चवदार जांभूळ वाइनसाठी उत्तम असल्याचे लक्षात आल्याचे संचालक डॉ. नीरज अग्रवाल यांनी सांगितले. वाइनसाठी जांभळाला मागणी वाढल्याने बचत गटांनी एक लाखहून अधिक झाडांची लागवड केल्याचा दावा केला जात आहे. जांभळापाठोपाठ करवंदापासून वाइन निर्मितीचा अभ्यास होत आहे. जांभूळ वाइनने नाशिकमधील वाइन पर्यटनाला नवीन ओळख मिळाली आहे. द्राक्ष वाइनच्या तुलनेत जांभूळ वाइनचे दर अधिक राहू नयेत, असाही प्रयत्न होत आहे.
गेल्या दीड दशकापासून द्राक्षापासून वाइननिर्मिती होत आहे. देशाची वाइन उद्योगाची उलाढाल एक हजार कोटींवर पोहोचली असून वाइन उत्पादनात नाशिकचा वाटा ६० टक्के आहे. नाशिक जिल्ह्यात पाच हजार एकर क्षेत्रावर वाइन द्राक्षांची लागवड झालेली आहे. दरवर्षी २५ ते ३० हजार टन द्राक्ष उत्पादित होऊन दीड कोटी लिटर वाइननिर्मिती केली जाते. मध्यंतरी मोठी किराणा दुकाने, सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीला राजकीय पातळीवर विरोध झाला होता. भारतीय वाइन उत्पादक संघटनेने पुढील पाच वर्षांत या उद्योगाची उलाढाल पाच हजार कोटींवर नेण्याचे ठरवले आहे. प्रमाण किती?द्राक्ष आणि जांभळापासून मिळणाऱ्या गराचे प्रमाण वेगळे असल्याने वाइनसाठी फळांचे आवश्यक प्रमाण कमी-जास्त आहे. एक लिटर वाइनसाठी १.२ किलो (१२०० ग्रॅम) द्राक्षे लागतात. तर जांभळाचे हेच प्रमाण अडीच (२५०० ग्रॅम) किलो आहे. बीच्या आकारावर गराचे प्रमाण ठरते. बिया आकाराने लहान असल्यास जास्त गर मिळतो. त्यामुळे जांभूळ वाइनसाठी लागणाऱ्या फळांचे प्रमाण बदलत असते, असे उत्पादक सांगतात.