लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक: अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झालेल्या पिकांच्या नुकसानीच्या पंचानाम्याचे ५० टक्के काम पूर्ण झालेले असून, येत्या दोन दिवसांत उर्वरित पंचनामे तातडीने पूर्ण करावेत, असे निर्देश पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत.
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक भागात सातत्याने अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. गारपिटीत कांद्यासह द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले. दिंडोरी तालुक्यात गारपिटीने झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी पालकमंत्री भुसे यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते. या पाहणीवेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, तहसीलदार पंकज पवार, गटविकास अधिकारी नम्रता जगताप, तालुका कृषी अधिकारी विजय पाटील, माजी आमदार धनराज महाले आदी उपस्थित होते.
हेही वाचा… नाशिक: अग्निशमन विभागातर्फे रंगीत तालीम; नागरिकांना प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन
दिंडोरी तालुक्यातील कुर्णोली, मोहाडी, खडक सुकेणे, चिंचखेड, जोपूळ परिसरातील द्राक्षबाग आणि इतर पिकांच्या नुकसानीची पाहणी पालकमंत्री भुसे यांनी केली. ज्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या सात बारावर पीक कर्जांची नोंद आहे, अशा शेतकऱ्यांकडून जिल्हा सहकारी बँकेने पीक कर्जाची सक्तीने वसुली करू नये, असे निर्देश भुसे यांनी जिल्हा सहकारी बँक अधिकाऱ्यांना दिले.
हेही वाचा… नाशिकमधल्या चांदीच्या गणपतीचे दागिने लंपास, सुरक्षारक्षकाच्या डोक्यात लोखंडी रॉडचा फटका मारून चोरी
द्राक्ष बागांसाठी संरक्षित आच्छादनासाठी प्रयत्न
काही शेतकऱ्यांनी द्राक्ष बागेवर केलेल्या आच्छादनामुळे त्यांचे गारपिटीमुळे होणारे नुकसान टळल्याचे निदर्शनास आले. पालकमंत्री भुसे यांनी शेतकऱ्यांच्या या प्रयोगशीलतेचे कौतुक केले. येणाऱ्या काळात शासन स्तरावरही द्राक्ष बागांचे नुकसान टाळण्यासाठी संरक्षित आच्छादनासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही सांगितले.