लोकसत्ता वार्ताहर
मालेगाव: अद्ययावत व प्रशस्त इमारतीत स्थलांतरीत झालेल्या येथील नोंदणी व मुद्रांक विभागाच्या कार्यालयामुळे मालेगावच्या विकासात व महसुलात भर पडणार असून या माध्यमातून नागरिकांना अत्याधुनिक व दर्जेदार सेवा-सुविधा उपलब्ध होईल, असा विश्वास पालकमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला.
येथील नोंदणी व मुद्रांक विभागातील सहदुय्यम निबंधक क्रमांक – तीन या कार्यालयाचे सटाणा रोडवरील नवीन प्रशस्त इमारतीत स्थलांतर करण्यात आले. हा उद्धाटन सोहळा पालकमंत्री भुसे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास नाशिक विभागाचे नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक विजय भालेराव, महापालिका आयुक्त भालचंद्र गोसावी, उपविभागीय अधिकारी नितिन सदगीर, नाशिकचे जिल्हा सहनिबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे, तहसीलदार नितिनकुमार देवरे, सह दुय्यम निबंधक ज्ञानेश्वर खांडेकर, सागर बच्छाव, बालाजी गोरे यांच्यासह नोंदणी व मुद्रांक विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
हेही वाचा… भुसावळ – मनमाड – पुणे हुतात्मा एक्सप्रेस नऊ महिन्यांपासून बंद; प्रवाशांची गैरसोय
नोंदणी व मुद्रांक हा विभाग नागरिकांना दस्त नोंदणीची सेवा देणारा तसेच महसूल संकलन करुन राज्याच्या विकासात भर घालणारा असल्याचे सांगत पुर्वीचे नोंदणी व मुद्रांक कार्यालय हे वरच्या मजल्यावर तसेच अपुऱ्या जागेत असल्यामुळे गैरसोयीचे होते. त्यामुळे कार्यालयीन कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी अडचण होत होती. विशेषत: दस्त नोंदणीसाठी येणारे ज्येष्ठ नागरिक,अपंग,आजारी व्यक्ती यांना मोठा त्रास सहन करावा लागत असे. ही गैरसोय दूर करण्यासाठी २००० चौरस फुटाच्या प्रशस्त जागेत हे कार्यालय स्थलांतरीत करण्यात आले असल्याचे भुसे यांनी सांगितले.
अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना सौजन्याची वागणूक देऊन आवश्यक सोई-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात तसेच या कार्यालयाच्या इमारतीत सीसीटीव्ही बसविण्याच्या सुचनाही भुसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. प्रास्ताविक जिल्हा सहनिबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांनी केले. सूत्रसंचालन देवळा येथील दुय्यम निबंधक राजू शिंदे यांनी केले.