नाशिक – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नाशिकमध्ये होणे ही नाशिकसाठी गौरवाची बाब आहे. नाशिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अधिनस्थ असणार आहे. या महाविद्यालयाचा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसह रुग्णांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार असून जिल्ह्याची आरोग्य सेवा अधिक बळकट होण्यास मदत मिळेल, असा आशावाद पालकमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला.

राज्यात एकाचवेळी १० शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते दूरदृश्य प्रणालीव्दारे बुधवारी करण्यात आले. त्यात नाशिकचाही समावेश आहे. शहरातील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या धन्वंतरी सभागृहात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा उद्घाटन समारंभ झाला. समारंभास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आदी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभागी होते. पालकमंत्री भुसे, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, खासदार डॉ. शोभा बच्छाव, खा. भास्कर भगरे, आ. राहुल ढिकले, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, महाराष्ट्र विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर आदी सभागृहात उपस्थित होते.

हेही वाचा >>>बुलढाणा : महायुतीचे ठरले; महाविकास आघाडीमध्ये पेच!  उमेदवारीचा तीढा…

यावेळी पालकमंत्री भुसे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उदघाटन होत असल्याने आनंद व्यक्त केला. महाविद्यालयात उच्च शैक्षणिक गुणवत्ता, जागतिक दर्जाचे संशोधन आणि आंतराष्ट्रीय दर्जाच्या अद्ययावत आरोग्य सुविधा मिळणार आहेत. १०० विद्यार्थी क्षमतेचे हे महाविद्यालय असून यातील ५० जागांसाठी शासनाने मंजुरी दिली आहे. सर्वांच्या विशेष प्रयत्नांतून आज हे महाविद्यालय उभे राहिले आहे. येणाऱ्या काळात वैद्यकीय महाविद्यालयात आवश्यक सेवा- सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून सहकार्य केले जाईल. या महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण व पदवी संपादन करून विद्यार्थी नक्कीच नाशिकचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास पालकमंत्री भुसे यांनी व्यक्त केला.

वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसाठी शासनाचे वेळोवेळी मदत व मार्गदर्शन लाभले. १५ ऑक्टोबरला या महाविद्यालयात पहिली विद्यार्थिंनी प्रविष्ट होणार आहे, असे सांगून कुलगुरू डॉ.कानिटकर यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले.