जळगाव – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विविध ग्रामीण रुग्णालयांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. कलियुगातील परमेश्‍वर म्हणजे डॉक्टर असून, आता जिल्हा सामान्य रुग्णालयात नवजात शिशूंसाठी मदर मिल्क बँक स्थापन करणार असल्याची घोषणा पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी येथे केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अद्ययावत शस्त्रक्रियागृहाचे पालकमंत्री पाटील व ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. चार स्वयंचलित शस्त्रक्रिया खोल्या असलेल्या सुसज्ज, अद्ययावत शस्त्रक्रियागृहाचे देशातील डॉ. शेखर भोजराज यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी पालकमंत्री पाटील, ग्रामविकास व पंचायत राजमंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती. यानंतर रुग्ण तपासणीतील कक्ष क्रमांक ११४ बी येथे मणकारोग तपासणी कक्षाचे उद्घाटन पालकमंत्री पाटील व ग्रामविकासमंत्री महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.

हेही वाचा >>>नाशिक: लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांची अवैध माया; अपसंपदेचा गुन्हा

दरम्यान, जिल्हा नियोजन भवनात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मुंबई येथील स्पाइन फाउंडेशन, निरामय सेवा फाउंडेशन आणि जीएम फाउंडेशन यांच्यातर्फे आरोग्य क्षेत्रातील विविध वर्गांचे मणक्याचे आजार याविषयी प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी पालकमंत्री पाटील, ग्रामविकासमंत्री महाजन, आमदार भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, डॉ. शेखर भोजराज, डॉ. अर्चना भोजराज, अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर आदींंची प्रमुख उपस्थिती होती.

अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांनी प्रास्ताविकात, कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. डॉ. भोजराज यांनी प्रशिक्षणाची गरज सांगितली. पालकमंत्री पाटील म्हणाले की, महात्मा गांधी यांनी खेड्याकडे चला हा मंत्र दिला होता. त्यानुसार ग्रामीण भागात आरोग्यसेवा करणार्‍या आशासेविका आरोग्य विभागाचा महत्त्वाचा कणा असून, त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. डॉक्टर परमेश्‍वरसमान असून, त्यांच्या कौशल्याची उपलब्धता जिल्हावासियांसाठी करून दिली जात आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालयासाठी ८४ कोटी निधी दिला आहे. माता व बालसंगोपनासाठी ३५ कोटी, तर मोहाडी रुग्णालयाला ७५ कोटी मंजूर केले आहेत. योग्य वेळी दूध न मिळाल्याने नवजात बालकांचे मृत्यू होतात. अशा बालकांना वेळेवर दूध मिळावे म्हणून जिल्हा रुग्णालयात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मदर मिल्क बँक स्थापन करण्याची घोषणा पालकमंत्र्यांनी करीत आरोग्य विभागासाठी निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही दिली.

हेही वाचा >>>धुळे: हुकूमशहाला खूश करण्यासाठीच लाठीहल्ला; अनिल गोटे यांचा आरोप

ग्रामविकासमंत्री महाजन म्हणाले की, डॉक्टरांचे कार्य हे परमेश्‍वरी कार्य असून, त्यांच्या कौशल्यामुळे जनसामान्यांना मोठा आधार मिळतो. मुंबईचे मणकारोगतज्ज्ञ डॉ. शेखर भोजराज हे रुग्णांसाठी आधारवड असून, त्यांच्या वैद्यकीय कौशल्याचा फायदा जळगावच्या रुग्णांसाठी आपण उपलब्ध करून दिला आहे. राज्य शासनाच्या आरोग्याच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे काम आशा, अंगणवाडी सेविका करीत असून, त्यांचे विविध प्रस्न मार्गी लावले असल्याचे सांगितले. डॉ. शेखर भोजराज यांच्या स्पाइन फाउंडेशनचे कार्य देशभरात सुरू असून, कौतुकास्पद आहे. जळगावात त्यांची सेवा मिळाली, हे आपले भाग्य आहे. आता सरकारी रुग्णालयात मोफत उपचार सेवा सुरू झाली असून, त्यामुळे सामान्यांना दिलासा मिळाला आहे, असेही मंत्री महाजन यांनी सांगितले.

डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. जोतीकुमार बागूल यांनी आभार मानले. कार्यक्रमास आरोग्यदूत रामेश्‍वर नाईक, उपअधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, डॉ. किशोर इंगोले, प्रशासकीय अधिकारी डॉ. जितेंद्र सुरवाडे, डॉ. योगिता बावस्कर, डॉ. विलास मालकर, दिलीप मोराणकर, संजय चौधरी, डॉ. सुनयना कुमठेकर, जनसंपर्क सहायक विश्‍वजित चौधरी, प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guardian minister gulabrao patil announced that mother milk bank will be established in general hospital amy