पाणी असूनही धरणगावकरांचे हाल झाले, त्याबद्दल क्षमा मागतो. मात्र, पाणीपुरवठ्यातील विलंब हा तांत्रिक चुकीमुळे झाला. आमच्यासोबत असताना विरोधकांना मुख्याधिकार्यांसह सर्व काही चालत होते. आता मात्र विरोधात गेल्यानंतर त्यांना सर्व काही चूक वाटत आहे. यामुळे त्यांनी जिथे लोणी खाल्ले, तिथल्या ताकाचे बोलू नये, अशी टीका पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. धरणगाव शहरात आगामी पन्नास वर्षांची पाण्याची सोय आम्ही करीत असून, माझ्या वक्तव्यांमधील ध चा मा करण्याचेच काम विरोधकांना उरले असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
ते म्हणाले की, यंदा अतिष्टीमुळे अनेक ठिकाणी पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यात पाणीप्रश्न उद्भवला आहे. याचे कारण बर्याच योजना या नदीवरून आहेत. योजनांच्या विहिरी नदीपात्रात किंवा नदीकाठावर असतात. पूर आल्यामुळे पंपांमध्ये गाळ साचतो. त्यामुळे पंप बंद पडतात. धरणगावमध्येही पंप बंद पडल्यामुळे पाणी असूनही टंचाई भासली. आता धरणगावमधील पाणीपुरवठा सुरळीत सुरू झाला आहे. शहरातील काही भागांतही टँकरद्वारे पाणी पोहोचवीत आहोत. तरीसुद्धा दिवाळीच्या निमित्ताने धरणगावकरांचे जे हाल झाले, त्याबद्दल मी जनतेची क्षमा मागतो. जे काही झाले आहे ते तांत्रिक कारणामुळे. आता जलवाहिन्यांचे काम सुरू आहे, ते सहा महिन्यांत पूर्ण झाल्यानंतर धरणगावच्या इतिहासात पुढील पन्नास वर्षे धरणगावकरांना कधीही पाणीटंचाई जाणवणार नाही, अशा पद्धतीचे नियोजन आपण या ठिकाणी केले आहे.
हेही वाचा- बंद साखर कारखान्यांविषयी जाणत्या राजाला जाब विचारा – राधाकृष्ण विखे यांचा शरद पवारांकडे रोख
कोण विरोधक? तेच तर सत्तेत होते. गुलाबराव पाटील काही नगराध्यक्ष नव्हते. आधी तेच नगराध्यक्ष होते, आता विरोधात असल्यानेे टीका करताय. आता त्यांनी टीका करताना हा विचार केला पाहिजे, जिथे लोणी खाल्लं तिथे ताकाचं बोलू नये, असा टोलाही पालकमंत्री पाटील यांनी लगावला. पाचोरा तालुक्यातील ढगफुटीविषय्ी ते म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात पंधरा मंडळ आहेत, तिथेही अतिवृष्टी झाल्याने शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील पंधराही मंडळांतील प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकर्यास शासनातर्फे मदत दिली जाणार आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चाही केली आहे. त्यांनी मदत दिली जाणार असल्याचे आश्वासन दिले आहे.