जळगाव : जिल्ह्यात तापमानाचा पारा चढतोय आणि दुसरीकडे लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीवेळी भाजपचा अनुभव घेतलेले पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी, आता आम्ही नवरदेववाले आहोत आणि तुम्ही नवरीवाले आहेत, असे सूचक वक्तव्य भाजपसंदर्भात केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 जिल्ह्यात भाजप विरुद्ध शिंदे गटाच्या नाराजीवर मंत्री पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवादात स्पष्टीकरण दिले. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीतील मित्रपक्ष भाजपच्या उमेदवारांसाठी प्रामाणिकपणे मदत केल्यानंतर विधानसभा निवडणुकीत मात्र भाजपने शिवसेना उमेदवारांसमोर बंडखोर उभे करून रणनीती आखत खेळी खेळली होती. अख्खा महाराष्ट्र हे जाणतो. ज्यावेळी आमची वेळ येते, तेव्हा भाजपनेही आमच्यासाठी काम करावे. आता आम्ही नवरदेववाले आहोत आणि ते नवरीवाले आहेत. आगामी होऊ घातलेल्या विधानसभेवेळी ते नवरदेववाले राहणार आणि आम्ही नवरीवाले राहू. एकमेकांना मदत करा, असा सल्ला त्यांनी दिला.

हेही वाचा >>>नाशिक : आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा, संशयित ताब्यात

लोकसभा निवडणूक झाल्यानंतर होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत मदत केली पाहिजे, अशीच अपेक्षा आमची आहे. गेल्या काळातील चुकांची आगामी विधानसभेवेळी पुनरावृत्ती होऊ नये, असेही त्यांनी नमूद केले. मागच्या ज्या काही गोष्टी घडल्या आहेत, त्या आगामी काळात घडणार नाही, अशी ग्वाही राज्यस्तरावर झालेल्या बैठकीत वरिष्ठांनी दिल्याचेही मंत्री पाटील म्हणाले.

हेही वाचा >>>नाशिक: महाराष्ट्र अंनिसतर्फे देहदान, अवयवदान सप्ताह

सध्या महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जळगाव लोकसभा मतदारसंघात उमेदवार मिळत नसल्याच्या मुद्यावर पालकमंत्री पाटील यांनी, ठाकरे गटाला चांगला व सर्वदृष्टीने संपन्न उमेदवार मिळेल, असे वाटत नाही, असे सांगितले.. शिवसेनेतून उठाव केल्यानंतर हे गद्दार आहेत, खोकेवाले आहेत, अमुक आहे, ढमुक आहेत, असे आरोप आमच्यावर करण्यात आले. जळगाव लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. त्यांना उमेदवार भेटत नाही, यावरून आम्ही हा बालेकिल्ला करुन ठेवला, हे आता सिद्ध होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guardian minister gulabrao patil criticizes bjp regarding elections amy