जळगाव : केळी पीकविम्याची मदत प्रलंबित असलेल्या शेतकर्‍यांना तत्काळ नुकसानभरपाई देण्याबरोबरच पूर व अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या केळी आणि इतर पीक क्षेत्रांची स्थळपाहणी करून एका आठवड्याच्या आत शंभर टक्के पंचनामे पूर्ण करावेत, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा प्रशासनास दिले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केळी पीकविमा प्रलंबित नुकसानभरपाई, मागील आठवड्यात झालेले नुकसान या विषयांवर जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना, पदाधिकारी व शेतकर्‍यांनी पालकमंत्र्यांकडे तक्रारी व निवेदने दिली आहेत. यावर पालकमंत्री पाटील यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे व विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली.

हेही वाचा : उद्यापासून पुन्हा कांदा कोंडी? केंद्राच्या धोरणास विरोध, लिलावापासून दूर राहण्याचा व्यापाऱ्यांचा निर्णय

गेल्या आर्थिक वर्षात केळी विमा काढला होता. मात्र, अद्याप नुकसानभरपाई न मिळालेल्या शेतकर्‍यांना भरपाई मंजूर करण्याची जबाबदारी विमा कंपनीची आहे. विमा कंपनीने या कामात हलगर्जीपणा करू नये. शेतकर्‍यांना आठवडाभरात नुकसानभरपाई त्यांच्या बँक खात्यात थेट वर्ग करावी. विमा कंपनीच्या कामावर जिल्हाधिकारी व कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी स्वतः लक्ष घालावे, अशा सूचना पालकमंत्री पाटील यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा : सिन्नरमध्ये जिंदालचा नवीन प्रकल्प; पेट्रोलियम उद्योगासाठी सामग्रीची देशात निर्मिती

तापी नदीला आलेला पूर व हतनूर पाणी फुगवट्यामुळे जिल्ह्यातील रावेर, यावल, मुक्ताईनगर, भुसावळ, जामनेर, बोदवड, चोपडा व जळगाव या तालुक्यांतील काही भागांतील बहुसंख्य शेतकर्‍यांच्या केळी व इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या भागात महसूल व कृषी यंत्रणा तत्काळ सक्रिय करण्यात यावी. तलाठी व कृषी सहायकांनी मुख्यालय सोडून न जाता आठवड्याच्या आत शंभर टक्के पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guardian minister of jalgaon district gulabrao patil istructed officials to make panchnama of farms within a week which affected by heavy rainfall css