नंदुरबार – डाॅक्टर ज्याप्रमाणे सकाळ, दुपार, संध्याकाळ अशा गोळ्या देतात, त्याप्रमाणे सध्या शपथविधी होत आहेत. सध्या सत्तेत एकत्र आहोत. पुढे काय होईल, माहीत नाही. शेवटी प्रारब्ध, असे सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मार्मिक भाष्य करतानाच आपल्या पुढील वाटचालीविषयी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी अनिश्चितता व्यक्त केली.
येथे तालुका विधायक समिती शिक्षण संस्था, बाजार समिती आणि विविध संस्थांच्या वतीने रविवारी आयोजित कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या शपथविधीवरून तुफान फटकेबाजी केली. आपल्या खास शैलीत गुलाबरावांनी सत्ताकारणावरून केलेल्या भाष्याने उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ उडाला.
हेही वाचा – जळगाव : दुचाकी, भ्रमणध्वनी चोरणारे तिघे पोलिसांच्या जाळ्यात
मी मंत्री होण्याची ही तीसरी वेळ आहे. अनिल पाटील पहिल्या वेळीच नट बनले, मी तर पहिल्यांदा बिनखात्याचा मंत्री होतो. आगे गाडी, पिछे गाडी, बीच मे बैठा गुलाब गडी यावर खुष होतो. आता आम्ही सत्तेत तीन भागीदार झालो, तुम्ही आल्यामुळे आमचे पन्नास खोके बंद झाले. तुम्ही तर आता रात्रीतून बड्या साहेबांकडेसुद्धा पोहोचले. तुमचं काय इलु इलु चाललंय, समजायलाच मार्ग नाही, असं सांगत गुलाबरावांनी अजित पवार आणि शरद पवार भेटीविषयी अनिल पाटील यांना चिमटा काढला.
हेही वाचा – भुसावळ-मनमाडदरम्यान तिसर्या मार्गावर इंटरलॉकिंगमुळे रेल्वे गाड्या रद्द
मी पंचवीस वर्षे आमदार आहे. पण अशी पाच वर्षे पाहिली नाहीत. पहिले तुमारे साथ लव्ह मॅरेज,..नंतर आघाडीला सोडले…मग आमचं पिवर टॅटू पार्टनर भाजप… मग त्यांच्यासोबत, कब के बिछडे कहाँ आके मिले…आता वर्ष उलटत नाही तोच हे परत…शपथविध्या तरी किती पहाव्यात? तुम्ही आता काँग्रेस तर नाही ना आणत, अशी अनिल पाटील यांना मिश्किलपणे गुलाबरावांनी विचारणा केली.