जळगाव – माफी मागणं आणि न मागणं हा अहंपणाचा विषय आहे. खडसे हे माझ्यापेक्षा मोठे आहेत, ते कधीही आले, तर त्यांचा पाया पडलो आहे. त्यांना माफी मागितल्याने काही मोठेपणा वाटत असल्यास त्यांनी चहापाण्यासाठी आपल्याकडे यावे, असे आमंत्रण देत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी न्यायालयात सुरु असलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात एकप्रकारे नमते घेतले आहे.
गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे हे महसूलमंत्री असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे जाहीर आरोप केले होते. त्यामुळे खडसे यांनी पाटील यांच्याविरोधात पाच कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. या खटल्याची सुनावणी जिल्हा सत्र न्यायालयातील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश नायगावकर यांच्यासमोर सुरू आहे. अब्रुनुकसानीच्या खटल्यात गैरहजर राहिल्यामुळे पालकमंत्री पाटील यांना जिल्हा सत्र न्यायालयाने खर्चापोटी ५०० रुपयांचा दंड केला होता. पाटील यांनी माफी मागितल्यास दावा मागे घेण्यासंदर्भात विचार करता येईल, असे खडसे यांनी म्हटले होते. त्याबाबत पाटील यांनी शासन आपल्या दारी उपक्रमाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना खुलासा केला.
हेही वाचा >>>धुळे: मंडळ अधिकारी लाच स्विकारताना जाळ्यात
भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबतचा न्यायालयातील दावा जुनाच आहे. पाच वर्षांपूर्वी तो दाखल केला होता. आपण त्या दिवशी मुंबई येथे बैठकीला गेलो होतो. त्यामुळे आपल्या वतीने वकिलांनी गैरहजर राहण्याबद्दलचा विनंती अर्ज दिला होता. तो न्यायालयानेही मान्य केला. न्यायालयाने खर्चापोटी ५०० रुपयांचा दंड केला होता. न्यायालयाची ती प्रक्रिया आहे. शेवटी न्यायालय हे मोठे आहे, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. पाच वर्षांपूर्वी खडसेंनी दावा दाखल केला होता. त्यावेळी तो जिल्हा स्तरावर फेटाळण्यात आला होता. खडसे हे उच्च न्यायालयात गेले. तेथे खडसेंना २० हजारांचा दंड करीत खालच्या न्यायालयात जाण्यास सांगण्यात आले होते. त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयात दावा दाखल केला. खडसेंनी तीन लाख रुपये अनामत भरले असल्याचेही पाटील यांनी सांगितले.