Jalgaon Rural Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा मतदासंघाच्या पुनर्रचनेनंतर धरणगाव तालुका आणि जळगाव तालुक्यातील गावे मिळून २००९ मध्ये जळगाव ग्रामीण मतदारसंघाची निर्मिती झाली. या मतदारसंघात शिवसेनेचा दबदबा राहिला आहे. शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील हे जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. २०२४ विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाकडून जळगाव ग्रामीण मतदारसंघातून गुलाबराव पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे.
पहिल्यांदा एरंडोल मतदारसंघातून आमदार
गुलाबराव पाटील १९९९ मध्ये पहिल्यांदा एरंडोल मतदारसंघातून आमदार झाले. त्यानंतर २००९ च्या विधानसभा निवडणुकीत जळगाव ग्रामीण मतदारसंघातून ते निवडणुकीसाठी उभे राहिले. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव देवकर यांनी त्यांचा पराभव केला. देवकर यांना ७१ हजार ५५६ तर गुलाबराव पाटील यांना ६६ हजार ९९४ मते मिळाली होती. २०१४ मध्ये शिवसेना भाजपाने स्वबळावर निवडणूक लढवली. या निवडणुकीवेळी देवकर जळगाव घरकुल गैरव्यवहारप्रकरणी तुरुंगात असतानाही राष्ट्रवादीने त्यांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. मात्र गुलाबराव पाटील यांनी ३१ हजारपेक्षा अधिक मतांनी देवकर यांचा पराभव केला. यानंतर युती सरकारमध्ये त्यांना सहकार राज्यमंत्रीपद मिळाले.
विजयाची घोडदौड कायम राखली
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीतही गुलाबराव पाटील यांनी विजयाची घोडदौड कायम राखली. या निवडणुकीत युती असतानाही भाजपाचे बंडखोर चंद्रशेखर अत्तरदे निवडणुकीत उतरले. पाटील यांनी ४६ हजार ७२९ मतांनी अत्तरदे यांचा पराभव केला होता. मात्र निवडणुकीनंतर शिवसेनेने युती तोडून काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाबरोबर महाविकास आघाडी केली. महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील सरकारमध्ये गुलाबराव पाटील यांनी पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्रीपदाची धुरा वाहिली. शिवसेनेत फुट पडल्यानंतर गुलाबराव पाटील एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले. पाटील हे एकनाथ शिंदे यांच्या जवळचे मानले जातात.
…यावरही यश अपयश अवलंबून
आगामी निवडणुकीत शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील हेच जळगाव ग्रामीण मतदारसंघातून उमेदवार असण्याची शक्यता आहे. तसेच महाविकास आघाडीकडून ही जागा शरद पवार गटाला सुटल्यास गुलाबराव पाटील विरुद्ध गुलाबराव देवकर असा सामना पुन्हा पाहायला मिळू शकतो. ठाकरे गटाकडून माजी उपमहापौर सुनील महाजन, सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनीही तयारी सुरू केली आहे. मात्र भाजपाकडून किती साथ मिळेल यावरही गुलाबराव पाटील यांचे यश अपयश अवलंबून आहे.
हेही वाचा – महायुतीत भाजपा मोठा भाऊ होतेय? अजित पवार प्रश्नावर म्हणाले, “आमचं सहमतीनं…”
गुलाबराव पाटील यांच्यापुढे कोणते आव्हान
गुलाबराव पाटील २०१९ ची विधानसभा निवडणूक पूर्वीच्या एकत्रित शिवसेनेच्या उमेदवारीने लढले होते. मात्र आता ते शिवसेना शिंदे गटाकडून जळगाव ग्रामीण मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. शिंदे गटाने गुलाबराव पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्यापुढे या मतदारसंघात महायुतीतून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गुलाबराव देवकर उभे ठाकले आहेत. मनसेनेही जळगाव ग्रामीण मतदारसंघात आपला उमेदवार उभा केला आहे. मनसेकडून मुकुंदा रोटे निवडणूक लढत आहेत.