जळगाव : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महिलांना सुरक्षिततेसाठी पर्समध्ये लाली पावडर न ठेवता मिरचीची पूड आणि चाकू ठेवण्याचा सल्ला दिला होता. महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना पाहता आता खरोखर बाळासाहेब म्हणाले होते, तसे करण्याची वेळ महिलांवर आली आहे, असे प्रतिपादन पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. जळगाव महापालिकेत महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मंत्री पाटील यांनी मार्गदर्शन केले. अत्याचाराच्या वाढत्या घटना पाहता महिलांनी वाघीण झाले पाहिजे. आजची नारी अबला न राहता ती सबला झाली पाहिजे. महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना कुठेतरी आळा बसला पाहिजे. महिलांचे आत्महत्येचेही प्रमाण वाढले आहे. महिलांनी आत्महत्या न करता त्यावर उपाय शोधावा, टोकाची भूमिका घेऊ नये, असे आवाहन गुलाबराव पाटील यांनी केले.

महिला सुरक्षेसाठी राज्य परिवहन महामंडळ विशेष मदतवाहिनी सुरू करणार असून, आरोग्य सेवा मोफत मिळावी यासाठी जळगाव जिल्ह्यात विशेष उपक्रम राबवले जातील. महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी जळगाव महापालिकेच्या सहकार्याने मॉल उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महिला सशक्तीकरण आणि सुरक्षा यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून भविष्यात महिलांसाठी अधिक सुविधा आणि योजनांची अंमलबजावणी करण्यात येईल, असेही मंत्री पाटील यांनी नमूद केले.

रोहिणी खडसेंना कोणाचा खून करायचा ?

महिला दिनी राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांना उद्देशून वाढत्या अत्याचारांच्या घटनांमुळे एक खून माफ करण्याची मागणी समाज माध्यमाद्वारे केली असताना, शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्या नेमका कोणाचा खून करणार आहेत त्याचे नाव सांगावे, अशी मिश्किल टिप्पणी केली. मुक्ताईनगर तालुक्यात नुकत्याच घडलेल्या छेडछाडीच्या प्रकारातील संशयितांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन दिवस अटकेची कारवाई न झाल्याने पोलिसांवर राजकीय दबावाखाली काम करत असल्याचा आरोप केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केला होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही त्यांनी दाद मागितली होती. त्यानंतर पोलिसांनी सातपैकी चार संशयितांना अटक केली. दुसरीकडे, शिंदे गटाच्या महिला आघाडी प्रमुखांनी छेडछाडीच्या गुन्ह्यातील दोषी कोणत्याही पक्षाचे असले तरी त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, अशा आशयाचे निवेदन पोलीस अधीक्षकांना देऊन खडसे परिवाराची बाजू घेण्याचा प्रयत्न केला होता. छेडछाड प्रकरणात शिवसेनेच्या (शिंदे गट) कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचे उघड झाल्यानंतर खडसे परिवार आणि शिंदे गटाचे मुक्ताईनगरातील स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील यांच्यातील जुना वाद पुन्हा उफाळून आला. दरम्यान, शिंदे गटाचे नेते व मंत्री गुलाबराव पाटील यांनी रोहिणी खडसे यांना उद्देशून त्या नेमका कोणाचा खून करणार आहेत, त्याचे नाव सांगावे, अशी टिप्पणी केली आहे.

Story img Loader