पंचवटी पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल

पूर्ववैमनस्यातून असणारे वाद मिटविण्यासाठी आलेल्या संशयितांनी गुरुवारी रात्री पेठ रस्त्यावरील कुमावतनगर येथे हवेत गोळीबार केल्याच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. हे वाद मिटविण्यासाठी भाजपच्या माजी नगरसेवकाने मध्यस्ती केली. उभयतांमध्ये तडजोड झाल्यावर संशयितांनी हवेत गोळीबार करून पोबारा केला. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात चार संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी कुमावत नगर येथे वास्तव्यास असणाऱ्या अशोक कारवाल यांनी तक्रार दिली. अशोकने दोन वर्षांपूर्वी योगेश दत्तू क्षीरसागरला मारहाण केली होती. त्या प्रकरणी तेव्हा अशोक विरुद्ध गुन्हा दाखल झाला. गुरुवारी रात्री कुमावतनगर येथे येऊन अशोकच्या पत्नीला शिवीगाळ करून योगेश पळून गेला. या घटनेनंतर अशोकने भाजपचे माजी नगरसेवक कमलेश बोडके यांच्या कानावर हा प्रकार घालून मध्यस्थी करण्याची विनंती केली. रात्री साडेअकराच्या सुमारास हे प्रकरण मिटविण्यासाठी बोडके या परिसरात पोहोचले. त्यांनी संशयित योगेशलाही बोलावून घेतले. योगेश त्याच्या अन्य तीन साथीदारांसह इंडिका कारने कुमावतनगर येथे पोहोचला. अशोक आणि योगेश यांच्यातील वाद बोडकेंनी मिटविले. उभयतांनी त्यास सहमती दर्शविली. या ठिकाणाहून जाताना योगेशने हवेत गोळीबार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी योगेश क्षीरसागरसह, दीपक मोहिते व त्याच्या अन्य दोन अशा एकूण चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

Story img Loader