नाशिक येथील विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाने मुक्ताईनगर तालुक्यात कारवाई करीत मालमाहू मोटारीतून सुमारे सतरा लाखांच्या गुटख्यासह एकवीस लाखांचा मुद्देमाल केला. या कारवाईतून मुक्ताईनगर तालुक्यात अवैध धंदे जोरात सुरू असल्याचे दिसून आले आहे. मुक्ताईनगर तालुक्यात लगतच्या मध्य प्रदेशातून अवैध गुटख्याची मोठ्या प्रमाणात तस्करी व वाहतूक केली जाते. ती रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून पथके नियुक्त केली आहेत. या पथकांद्वारे वेळोवेळी कारवाई केली जाते.
नाशिक येथील विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या विशेष पथकाला मुक्ताईनगर- बर्हाणपूर मार्गावर मालवाहू मोटारीतून गुटखा नेला जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार रात्री पथकाने सापळा रचत मध्यरात्री उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या तपासणी नाक्याजवळ संशयास्पद मालवाहू मोटारीची तपासणी केली. यात सुमारे सतरा लाखांचा गुटखा आढळून आला. गुटख्यासह चार लाखांची मालवाहू मोटार असा मिळून एकवीस लाखांचा मुद्देमाल विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाने जप्त केला.
मोटारचालक चेतन सुभाष झांबरे (वय ३२, रा. कोथळी, ता. मुक्ताईनगर), विनायक मनोहर चांदेलकर (वय १९, रा. बोदवड) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांनी गुटख्याचा साठा अनुपम गोसावी (रा. मुक्ताईनगर) यांच्या मालकीचा असल्याचे सांगितले. याप्रकरणी मुक्ताईनगर येथील पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.