लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक : राज्यात प्रतिबंधित असलेल्या सुंगधित तंबाखूचा (गुटखा) साठा अन्न व औषध प्रशासनाच्या विभागाने पेठ तालुक्यातील कोटंबी घाटात वाहनातून जप्त केला. सुमारे चार लाख ८७ हजार ५०० रुपयांचा गुटखा आणि वाहन असा मुद्देमाल जप्त केला.
अन्न व औषध प्रशासनाने गुटख्याविरूध्द मोहीम सुरू केली असून त्याचाच भाग म्हणून अन्न सुरक्षा अधिकारी योगेश देशमुख यांच्या पथकाने जिल्ह्यातीत सीमावर्ती भाग असलेल्या पेठ तालुक्यात पाळत ठेवली होती. यासंदर्भात पोलिसांशीही समन्वय साधण्यात आला होता. कोटंबी घाटात एक वाहन संशयास्पदरित्या फिरत असल्याचे लक्षात आल्यावर पथकाने पोलिसांना माहिती दिली. पेठ पोलिसांनी संशयास्पद वाहन थांबवून तपासणी केली असता इतर मालाबरोबर तंबाखुच्या गोण्या आढळल्या.
आणखी वाचा- पिंजऱ्यात अडकलेल्या बछड्याची सुटका
वाहन पेठ पोलीस ठाण्यात आणण्यात आले. देशमुख यांनी वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये राज्यात प्रतिबंधित असलेल्या तंबाखुच्या गोण्या आढळल्या. वाहन चालकाने जयप्रित सिंह (रा. हरियाणा) असे त्याचे नाव सांगितले. वाहनातून १३ गोण्या आणि ५०० ग्रॅम वजनाची पाकिटे असा चार लाख ८७,५०० रुपयांचा साठा जप्त केला. यातील काही नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. तसेच वाहनही ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.