नाशिक: म्हसरूळ परिसरातील ज्ञानदीप आश्रमातील काही अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाचा प्रकार उघड झाल्यानंतर आश्रमातील १६ मुलींना शासकीय वसतिगृहात ठेवण्यात आले आहे. परंतु, घडलेल्या प्रकारामुळे मुलींमध्ये नैराश्य आले असून त्यांना वाटणारी भीती, पालकांकडून येणारा दबाव यामुळे त्यांचे शिक्षण खंडित होण्याची शक्यता निर्माण झाली असून शिक्षण सुरु राहावे, यासाठी सर्वस्तरातून प्रयत्न करण्यात येणार आहेत.
ज्ञानदीप आश्रम बाळकृष्ण मोरे हा अवैधरित्या चालवत होता. त्याने लैंगिक शोषण केल्याची सात मुलींनी तक्रार केली आहे. मोरे हा अल्पवयीन विद्यार्थ्यांकडून आश्रमातील कामे करुन घेत असल्याचेही उघड झाल्याने त्याच्याविरोधात वेठबिगारीचा गुन्हा दाखल झाला आहे. आश्रमातील एकेक प्रकार बाहेर आल्यानंतर महिला व बाल विकास विभाग, बाल कल्याण समिती आणि पोलिसांनी मुलींना सुरक्षित रित्या शासकीय ठिकाणी हलविले. मुलींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. आश्रमातील मुलींचे पालक घडलेल्या प्रकारामुळे संतप्त झाले आहेत. त्यांनी मुलींना घरी नेण्याची तयारी केली आहे. सध्या या मुलींना बाल कल्याण समितीसमोर सादर केल्यानंतर पुढील दोन ते तीन दिवसात पालकांच्या ताब्यात त्यांना दिले जाणार आहे.
हेही वाचा >>> ‘सुरेशदादांनी मैदानात उतरावं हीच अपेक्षा’; गुलाबराव पाटील
१६ मुलींपैकी बहुतांश मुली नववी, दहावीच्या आहेत. हा प्रकार उघड झाल्यानंतरर त्यांना शासकीय आश्रमात ठेवण्यात आले आहे. यामुळे सध्या मुलींचे शिक्षण थांबले आहे. दहावींच्या मुलींनी परीक्षेचे अर्ज भरले आहेत. त्यांचा बाहेरून अभ्यास सुरू आहे. मात्र इतर मुलींच्या अभ्यासात खंड पडला आहे. या मुलींची शिक्षणाची आवड पाहता त्यांना पालकांच्या स्वाधीन करतांना त्यांच्या गावातील शाळांमध्ये किंवा येथील जवळपास शाळेत या मुलींना प्रवेशित करत त्यांचे शिक्षण सुरू रहावे, यासाठी महिला व बाल विकास विभागाकडून प्रयत्न करण्यात येणार आहे.
हेही वाचा >>> राजकारणातील पुनरागमनास कुटूंबीयांचा विरोध; सुरेश जैन सध्या राजकारणापासून दूरच
ज्ञानदीप आश्रमातील पीडित मुलींसह अन्य मुली सुरक्षित आहेत. त्यांना बाल न्यायालयात हजर करण्यात येईल. त्यानंतर पालकांविषयी खात्री पटल्यानंतर त्यांना पालकांकडे सुपूर्द केले जाईल. मुली घाबरल्या आहेत, त्यांना नैराश्य आले आहे. त्यांचे समुपदेशन सुरू आहे. त्यांची शिक्षणाची आवड पाहता पालकांचेही समुपदेशन करुन त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.
– अजय फडोळ (जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी)