तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बँक खात्याचा संकेत शब्द हॅक करून भामटय़ाने  बदलानी यांच्या खात्यावरील ६५ लाखांची रक्कम हडपली असल्याचा प्रकार शहर परिसरात घडला. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस स्थानकात माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राका कॉलनी येथे दिनेश बदलानी (३७) राहतात. त्यांचे बँक ऑफ इंडिया खात्यावर ६० लाखांहून अधिक रक्कम होती. या रकमेची माहिती असलेल्या अज्ञात इसमाने ही रक्कम आपल्या खात्यावर वळती करण्यासाठी चित्रपटाच्या कथेला शोभेल अशी अनोखी शक्कल लढविली. बँकेच्या खात्यात समाविष्ट केलेला भ्रमणध्वनी क्रमांक बंद केला. हा क्रमांक बंद करत त्याच क्रमांकाचे दुसरे सिमकार्ड मिळवले. या दुसऱ्या सिमकार्डच्या मदतीने संशयिताने संगणकावर बसून बँकेच्या खात्यात हेराफेरी केली. यादरम्यान संशयिताने मुंबई येथील सांताक्रूझ परिसरातील आयसीआयसीआय बँक, विजया बँक, उत्तर प्रदेश येथील गोमतीनगर परिसरातील एचडीएफसी बँक या बँकांच्या खात्यांचे संकेत शब्द हॅक केले. पासवर्ड हॅक केल्यानंतर संशयिताने त्यांच्या खात्यातील ६५ लाख १० हजार रुपयांची रोख रक्कम तिन्ही बँकांच्या खात्यात वर्ग केली.

दरम्यान, बदलानी यांचे नेहमीप्रमाणे बँकेचे व्यवहार सुरू असताना खात्यातील शिल्लक रक्कम मोठय़ा प्रमाणावर वळती झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत बँक ऑफ इंडियाकडे विचारणा केली असता तांत्रिक प्रकरण असल्याने त्यांनी पोलिसांत जाण्याचा सल्ला दिला. संशयिताने या कालावधीत पैसे स्वत:च्या खात्यावर वळते करून घेतले. सरकारवाडा पोलीस स्थानकात पोलीस व तांत्रिक गुन्हे विश्लेषणकडे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader