लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : जळगाव, उत्तर महाराष्ट्रात रविवारी सलग दुसऱ्या दिवशी नाशिकच्या येवला, निफाड आणि जळगाव जिल्ह्यातील काही भागात वादळी पावसासह गारपीट झाली. पावसामुळे कांदा, केळीबागांचे मोठे नुकसान झाले.

रविवारी नाशिक जिल्ह्यातील रानवड परिसरात वादळी पाऊस झाला. येवला तालुक्यातील राजापूर, पन्हाळसाठे भागात गारपीट झाली. तालुक्यात शनिवारीही गारपीट झाली होती. पीक नुकसानीबाबत ग्रामस्तरीय समितीला पाहणी करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. ग्रामीण भागात सध्या कांद्याची काढणी प्रगतीपथावर आहे. तो काढून खळ्यात ठेवला जातो. अकस्मात आलेल्या पावसाने अनेक ठिकाणी कांदा भिजला. एप्रिलच्या सुरुवातीला नैसर्गिक संकटात सहा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. त्यात ७० टक्के कांद्याचे प्रमाण होते.

जळगावच्या रावेर तालुक्यास शनिवारी वादळी पाऊस आणि गारपिटीने तडाखा दिल्यानंतर रविवारी चोपडा तालुक्यातील काही गावांमध्ये पाऊस आणि तुरळक गारपीट झाली. शनिवारच्या गारपिटीमुळे रावेर तालुक्यातील सुमारे ४५१ हेक्टरवरील केळीच्या बागांचे नुकसान होऊन ६४९ शेतकरी बाधीत झाले.