नंदुरबार – जिल्ह्यात शुक्रवारी पुन्हा एकदा गारपिटीसह वादळी पाऊस झाल्याने पिकांच्या नुकसानीत भर पडणार आहे. जिल्ह्यात चार दिवसांपासून अवकाळी पाऊस हजेरी लावत असताना गारपिटीची भर पडल्याने शेतकरी हादरला आहे.

मार्च महिन्यात जिल्ह्यात दुसऱ्यांदा गारपीट झाली. शुक्रवारी दुपारी साडेतीननंतर आष्टे ठाणेपाडा, सिंदबण, केवडीपाडा, छडवेल कोर्डे या भागात गारांचा पाऊस झाला. या भागातून शेवाळी-नेत्रंग महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू असल्याने रस्त्यासाठी टाकलेल्या मातीच्या भरावावर गारांची चादरच पसरल्याचे चित्र दिसून आले. सहा मार्च रोजी या भागासह जिल्ह्यात गारपीट झाली होती. त्यावेळी चार हजारहून अधिक शेतकऱ्यांचे दोन हजार हेक्टरहून अधिक पिकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले होते. त्यातच चार दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस येत आहे. आधीच्या गारपिटीच्या तडाख्यातून वाचलेली पिके शुक्रवारच्या गारपिटीमुळे वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यातच शासकीय कर्मचारी संपावर असल्याने पंचनामे होत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.

हेही वाचा – धुळे जिल्ह्यात चार बालविवाह रोखण्यात बाल संरक्षण समितीस यश

हेही वाचा – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे ३०८ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या गहू, हरभरा, ज्वारी, मका, पपई, केळी, टरबूज, खरबूज यासह अन्य पिकांच्या मोठ्या नुकसानीची शक्यता व्यक्त होत आहे.

Story img Loader