लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक : निफाड तालुक्यातील शिरसगाव शिवारात १० महिन्यांपूर्वी लढाऊ विमान कोसळल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. हिंदूस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडकडून (एचएएल) नुकसानग्रस्त तीन शेतकऱ्यांना एकूण ३२ लाख ५० हजार रुपयांची भरपाई थेट त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
नियमित सरावासाठी चार जून २०२४ रोजी लष्कराच्या सुखोई -एस बी-१८२ लढाऊ विमानाने उड्डाण केले होते. उड्डाणानंतर विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने निफाड तालुक्यातील शिरसगाव, वडाळी (नजीक) शिवारात दुपारी एक वाजून १० मिनिटांनी ते कोसळले होते. विमानात बिघाड झाल्याचे लक्षात येताच नियंत्रक कक्षाला संदेश देत वैमानिक आणि सहवैमानिकांनी पॅराशूटच्या सहाय्याने उडी घेतली होती.
विमान कोसळताच त्यास आग लागल्याने धुराचे लोळ उठले होते. परिसरातील शेतकऱ्यांच्या द्राक्षबागांसह टोमॅटो, कोथिंबीर या पिकांचे तसेच विहिरीचे नुकसान झाले होते. अपघातानंतर एचएएलकडून आढावा घेत नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते. या अपघातास १० महिने झाल्यानंतर एचएएल प्रशासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ३२ लाख ५० हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.
मदत मिळालेले शेतकरी
विमान अपघातात शिरसगाव येथील शेतकरी सुखदेव मोरे यांच्या अडीच बिघे द्राक्षबागेचे नुकसान झाल्याने त्यांना २६ लाख रुपयांची मदत मिळाली. ज्ञानेश्वर मोरे या शेतकऱ्याचे टोमॅटो पिकासह विहिरीचे नुकसान झाल्याने त्यांना पाच लाख ८० हजार रुपये, तर लक्ष्मण मोरे यांच्या कोथिंबीर पिकाचे नुकसान झाल्याने त्यांना ७३ हजार रुपयांची मदत एचएएल प्रशासनाकडून थेट त्यांच्या बँक खात्यात टाकण्यात आली.
वर्षांपूर्वी आकाशात घिरट्या घालत लढाऊ विमान थेट आमच्या शेताजवळ कोसळले होते. या अपघातात आमच्या द्राक्षबागेचे प्रचंड नुकसान झाले. १० महिन्यानंतर प्रशासनाकडून नुकसानीची मदत भरपाई देण्यात आली. -सुखदेव मोरे (नुकसानग्रस्त शेतकरी, शिरसगाव)