नाशिक : स्वदेशी बनावटीचे हलके तेजस एमके – १ ए या लढाऊ विमानाच्या उत्पादनाला गती देण्यासाठी एचएएलच्या येथील प्रकल्पात नवी उत्पादन साखळी आता कार्यान्वित करण्यात आली आहे. याआधीच्या दोन उत्पादन साखळ्या बंगळुरु येथे आहेत. नाशिकच्या तिसऱ्या साखळीमुळे एचएएलची उत्पादन क्षमता वर्षाकाठी १६ ते २४ विमानांनी विस्तारणार आहे. या निमित्ताने सुखोईनंतर नाशिक प्रकल्पात बऱ्याच वर्षांनी लढाऊ विमानाची बांधणी होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शुक्रवारी संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांनी येथील तेजसच्या तिसऱ्या उत्पादन साखळीचे उद्घाटन केले. याच प्रकल्पात देखभाल व दुरुस्ती झालेले (ऑव्हरहॉल) १०० वे सुखोई विमान मिग संकुलाचे मुख्य कार्यकारी अधिकारी साकेत चतुर्वेदी यांच्या हस्ते सहायक हवाई दल प्रमुख (अभियंता ए) एअर व्हाईस मार्शल सरीन यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी एचएएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सी. बी. अनंतकृष्णन उपस्थित होते.

हेही वाचा >>> अयोध्यावारी आणि नाशिकचे शिवसैनिक समीकरण जुळले

अरमाने यांनी एचएएलने सुखोईची संपूर्ण देखभाल व दुरुस्तीकरिता (ओव्हरहॉल) उभारलेली सुविधा आणि तेजसची नवीन उत्पादन साखळी स्थापन करण्याचे स्वीकारलेल्या आव्हानाचे कौतुक केले. देशाच्या सुरक्षेच्या गरजा एचएएल पूर्ण करीत आहे. आत्मनिर्भर भारत अंतर्गत केंद्र सरकारने अनेक धोरणे आणली. त्यामुळे एचएएल अतिशय महत्वाच्या स्थितीत आहे. येत्या काही वर्षात एचएएल अधिक उत्पादन करणार आहे. संरक्षण सामग्रीच्या बाजारपेठेत आक्रमकपणे स्पर्धा करण्यासाठी एचएएलने नव्या संकल्पना राबवाव्यात, नवीन उपक्रम हाती घ्यावे, असा सल्ला त्यांनी दिला. देशाला अत्याधुनिक मानवरहित विमानांची गरज असून अशा नव्या क्षेत्राकडे लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी केले.

एचएएलच्या येथील प्रकल्पात २०१४ मध्ये सुखोईची दुरुस्ती व ऑव्हरहॉलची व्यवस्था करण्यात आली होती. भारतीय हवाई दलाची गरज पूर्ण करण्यासाठी जगात कुठेही ती पहिली आहे.

हेही वाचा >>> जळगावात रस्ते काँक्रिटीकरणासाठी शंभर कोटींचा निधी मंजूर

मिग श्रेणीतील व नंतर सुखोई विमानांची बांधणी व देखभाल दुरुस्तीच्या दीर्घ अनुभवातून एचएएलने हवाई दल, खासगी उद्योगांच्या सहकार्यातून तंत्रज्ञानात प्रभृत्व मिळवले. त्यामुळे एचएएलशी संलग्न अन्य प्रकल्पही या कामात सहभागी झाले आहेत. पुढील काही वर्षात ओव्हरहॉलसाठी आवश्यक बहुसंख्य सुट्टे भाग देशांतर्गत निर्मिती केले जातील. त्यावरील अवलंबित्व कमी करण्याची एचएएलची योजना असल्याचे सांगण्यात आले.

तेजसच्या नव्या उत्पादन साखळीमुळे एचएएलची उत्पादन क्षमता दरवर्षी १६ ते २६ विमानांची वाढणार आहे. सध्याच्या भू राजकीय परिस्थितीत पुरवठा साखळीत अडचणी आहेत. या परिस्थितीत नाशिक प्रकल्पाने दरवर्षी २० सुखोई विमानांची देखभाल दुरुस्ती (ओव्हरहॉलची) क्षमता गाठली. एचएएलने बंगळुरूमध्ये तेजसच्या दोन उत्पादन साखळी (सुविधा) उभारल्या आहेत.

सी. बी. अनंतकृष्णन (मुख्य कार्यकारी अधिकारी एचएएल)

देशाची गरज व निर्यातीची संधी

स्वदेशी बनावटीचे हलके तेजस हे ४.५ पिढीतील विमान मानले जाते. गतवर्षीच्या डिफेक्स्पो प्रदर्शनात त्याचे सामर्थ्य अधोरेखित करण्यात आले होते. तेजसच्या एमके -१ आणि एमके-१ ए च्या (अल्फा) निर्मितीनंतर संरक्षण संशोधन व विकास संस्था नवीन रचना, अधिक मारक क्षमतेचे तेजस एमके- २ हे लढाऊ विमान विकसित करीत आहे. आधुनिक रडार यंत्रणा, इलेक्ट्रॉनिक युद्ध तंत्रासाठी उपकरणे सामावणाऱ्या तेजसची साडेसहा टन शस्त्रास्त्रे वाहून नेण्याची क्षमता आहे. हवेतून इंधन भरण्याच्या व्यवस्थेमुळे ते तीन हजार किलोमीटरपर्यंतचा पल्ला गाठू शकते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hal start 3rd production line of lca tejas at nasik zws